‘माझ्या वडिलांच्या नावाचा क्षुद्र राजकारणासाठी वापर’, पर्रिकरांच्या मुलाचं पवारांना पत्र

राफेल करारासंदर्भात गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविषयी केलेल्या टिप्पणीवरून पर्रीकरांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी शरद पवारांना भावनिक पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे.

Mumbai
sharad pawar
शरद पवार

‘माझे वडील आजाराचा सामना करत असताना ज्यांनी चौकशी करायचीही तसदी घेतली नाही, त्यांनी राजकीय चिखलफेकीसाठी त्यांचे नाव घ्यावे, हे दुःखदायक आहे’, अशा शब्दांत गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुलाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सुनावलं आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उत्पल पर्रीकर यांनी पवारांना खुलं पत्रच लिहिलं आहे. ‘राफेल खरेदी व्यवहारामुळे मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्रीपद सोडून गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून परतले, असे खोटारडेपणाने सुचविणे हा मनोहर पर्रिकर आणि गोव्याच्या जनतेचा अपमान आहे’, असं उत्पल यांनी या पत्रात म्हटलं आहे.

‘वडील हयात नसल्यामुळेच हे आरोप’

राफेल करारावरून शरद पवार यांनी पर्रीकरांविषयी टिप्पणी केली होती. यावरून उत्पल यांनी व्यथित होत हे पत्र पवारांना पाठवलं आहे. ‘माझे वडील हयात असताना आणि धैर्याने आजाराचा सामना करत असताना काही राजकीय नेत्यांनी त्यांचे नाव क्षुद्र राजकारणासाठी वापरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. पण आता ते आपल्यामध्ये नसल्यामुळेच कदाचित तुम्ही त्यांचे नाव घेऊन खोटे बोलण्याचे स्वातंत्र्य घेत आहात. एक ज्येष्ठ आणि सन्मानित राजकारणी म्हणून भारतातल्या जनतेला पवार साहेबांकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती’, असं या पत्रात म्हटलं आहे.

‘राफेल कराराचे पर्रीकर मुख्य शिल्पकार’

उत्पल पर्रिकर यांनी शरद पवार यांना उद्देशून म्हटले आहे, “आपण विधान केलेच आहे तर मला काही मूलभूत बाबी सांगू दे. माझे वडील एक अत्यंत प्रामाणिक आणि निस्पृह व्यक्ती होते, ज्यांनी गोव्यात असो नाही तर दिल्लीत, देशाच्या सर्वोच्च हितासाठीच काम केले. त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आणि त्यासाठी त्यांचे सदैव स्मरण केले जाईल. त्यापैकीच एक निर्णय राफेल विमानखरेदीचा होता. ते या निर्णयाचे मुख्य शिल्पकार होते. नंतर जेव्हा गोव्याच्या जनतेला ते त्यांच्या सेवेसाठी परत हवे होते, त्यावेळी ते कर्तव्यबुद्धीने परतले आणि अखेरच्या श्वासापर्यंत गोव्याची सेवा केली.”

पत्रात पुढे उत्पल म्हणतात, ‘एक माजी संरक्षणमंत्री म्हणून आपल्या शूर सैनिकांना शस्त्रसज्ज करण्याचे किती महत्त्व आहे, हे आपण जाणत असाल याची मला खात्री आहे. आपल्या सशस्त्र दलांना बळकटी देण्याच्या प्रयत्नात अडथळा आणण्यासाठी खोडसाळ अपप्रचार मोहीम सुरू असून आपणही त्याचे भाग झालात, हे क्लेषकारक आहे’, अशा शब्दांत त्यांनी आपला खेद व्यक्त केला आहे.


हेही वाचा – ‘या’ निर्णयानं पर्रीकरांनी वाचवले ४९ हजार कोटी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here