चांगला नवरा नाही शोधला; मॅट्रिमोनियल साईटला ६२ हजारांचा दंड

तुम्हाला देखील मॅट्रिमोनियल साईटवर मनासारखे स्थळ मिळत नसेल आणि मॅट्रिमोनियल साईट तुमच्याकडून पैसे उकळत असेल तर ही बातमी एकदा वाचाच

Chandigarh
matrimonial sites fine
प्रातिनिधिक छायाचित्र

आजकाल लग्न जमविण्यासाठी अनेक तरुण-तरुणी मॅट्रिमोनियल साईटवर आपला प्रोफाईल रजिस्टर करतात. मात्र मॅट्रिमोनियल साईटवर प्रत्येकाला हवा तसा नवरा किंवा बायको मिळतेच असं काही नाही. सध्याची विभक्त कुटुंब पद्धती आणि दुरावलेल्या समाजामुळे योग्य स्थळ शोधण्यासाठी मॅट्रिमोनी एजन्सीचा आधार घेतला जातो. मात्र त्यातही अनेकांची फसवणूक होताना दिसते. चंदीगढमध्ये अशाच एका मॅट्रिमोनियल एजन्सीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. एका डॉक्टर मुलीला योग्य वर शोधून दिला नाही म्हणून मॅट्रिमोनियल साईटला तब्बल ६२ हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

चंदिगढ येथील सुरेंद्रपाल सिंग चहल आणि त्यांची पत्नी नरेंद्र कौर चहल यांनी आपल्या डॉक्टर मुलीसाठी वेडिंग विश प्रायव्हेट लिमिटेड या साईटवर प्रोफाईल रजिस्टर केला होता. आपली मुलगी मांगलिक असल्यामुळे मॅट्रिमोनियल एजन्सीने मुलीला चंदिगढ येथील डॉक्टर असलेला चांगला मुलगा शोधून देऊ असे सांगितले. चंदीगढमध्ये राहणारा आणि जाट समुदायातील असलेला डॉक्टर मुलगा शोधण्यासाठी चहल परिवाराने सांगितले होते. त्याप्रमाणे मॅट्रिमोनियल साईटने चहल परिवाराकडून सर्विस चार्जेसही घेतले.

प्रोफाईल रजिस्टर केल्यापासून ९ महिन्यांच्या आत १८ स्थळ सुचवू, असे आश्वासन एजन्सीने दिले होते. या आश्वासनाला भुलून चहल परिवाराने २६ सप्टेंबर २०१७ रोजी मॅट्रिमोनियल साईटकडून ५० हजार रुपयांचे रॉयल पॅकेज घेतले. मात्र त्यानंतर एजन्सीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आपल्याला स्थळ सुचवत नसल्याचे चहल यांच्या लक्षात आले. एजन्सीकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी चंदीगढच्या ६० किमी परिसरातील मुलगा शोधून देऊ, असे पुन्हा एकदा आश्वासन दिले.

मात्र अनेक दिवस उलटूनही अपेक्षित निकाल मिळत नसल्यामुळे चहल यांनी एजन्सीला २२ ऑक्टोबर २०१८ रोजी कायदेशीर नोटीस पाठवली. या नोटीशीमध्ये त्यांनी आपण भरलेले पैसे परत करा, अशी मागणी केली. मात्र एजन्सीने या नोटीशीला भिकही घातली नाही. त्यामुळे चहल यांनी ग्राहक मंचचा दरवाजा ठोठवला. त्यानंतर एजन्सीने ग्राहक मंचाला सांगितले की, “आम्ही चहल यांना काही प्रोफाईल दाखवले होते, मात्र त्यांच्याकडून ते नाकारण्यात आले. तसेच आम्ही त्यांना आणखी प्रोफाईल दाखवू शकतो ते ही मोफत.”

ग्राहक मंचासमोर झालेल्या सुनावणीत मंचाने मॅट्रिमोनिय एजन्सीचा युक्तीवाद फेटाळून लावला. इतर मॅट्रिमोनियल संस्था ग्राहकाचा वेळ फुकट घालवल्यास त्यांना रिफंड देतात. त्यामुळे वेडिंग विश यांना देखील चहल यांनी भरलेले ५० हजार रुपये, त्यावर वार्षिक ९ टक्के व्याज, ७ हजार रुपये नुकसान भरपाई आणि खटला चालविण्यासाठी लागलेले ५ हजार अशी एकत्रित ६२ हजारांची रक्कम चहल यांना द्यायला सांगितली.