मोठा दिलासा! ‘मॉडर्ना’ कंपनीची लस ९४.५% यशस्वी!

corona vaccine
प्रातिनिधीक फोटो

जगभरातले नागरिक कोरोनाच्या लसीची आतुरतेनं वाट पाहात असताना दुसरीकडे युरोपातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट देखील आली आहे. त्यामुळे या देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ ओढवली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या लस बनवणाऱ्या दोन कंपन्यांनी अवघ्या जगाला दिवाळीनिमित्त मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. रविवारी फायजर कंपनीने त्यांची लस कोरोनावर ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा केला होता. आज अमेरिकेतील दुसरी आणि महत्त्वाची लस उत्पादक कंपनी मॉडर्नाने आपली लस ९४.५ टक्के प्रभावी ठरल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे जगभरातल्या लोकांसाठी कोरोनावरची प्रभावी लस लवकरात लवकर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मॉडर्ना कंपनीची लस सध्या तिसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्याच्या सुरुवातीच्या निरीक्षणांचे अहवाल हाती आले असून त्यावरून कंपनीकडून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यात ९५ व्यक्तींवर या लसीचा वापर करण्यात आला होता. त्यापैकी फक्त ५ लोकांनाच लसीचे डोस दिल्यानंतर देखील कोरोनाची लागण झाली. त्यामुळे हे निष्कर्ष फक्त मॉडर्नासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी दिलासादायक म्हणता येतील.