राम मंदिर निर्माणासाठी मोदी सरकारचं योगदान नाही, भाजप नेत्याचा घरचा आहेर

Subramaniam Swamy

राम मंदिर निर्माणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचं काही योगदान नसल्याचं सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी घरचा आहेर दिला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र असं असतानाच भाजप नेत्याकडूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला घरचा आहेर देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांना राम मंदिराच्या भूमी पूजनाचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे यांनी थेट मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. टीव्ही ९ भारतवर्ष या वहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुब्रमण्यम स्वामींनी याबाबत भाष्य केलं. पंतप्रधान मोदींचं राम मंदिराच्या उभारणीत काहीच योगदान नाही. सर्वोच्च न्यायालयात मंदिरासंदर्भात जो काही युक्तिवाद करायचा होता तो आम्ही केला. तसंच सरकारने असं काहीच काम केलेलं नाही, ज्यामुळे न्यायालयाने या निर्णय दिला, अशी टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

वास्तवात ज्यांनी काम केलं ते राजीव गांधी, नरसिंहराव, अशोक सिंघल आदींची नावं सुब्रमण्यम स्वामी यांनी घेतली. दरम्यान, एकीकडे भाजप राम मंदिरा निर्माणाचा गवगवा करत आहे. मात्र दुसरीकडे पक्षातून जहरी टिकांचा सामना केंद्र सरकारला करावा लागत आहे.