घरदेश-विदेश'त्या धरणाची तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरुपी उपाययोजना करावी'

‘त्या धरणाची तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरुपी उपाययोजना करावी’

Subscribe

रेल्वेच्या जीआयपी धरणाची तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

सध्या सुरु मुसळधार पावसामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ येथील काकोळे गावातील रेल्वेच्या जीआयपी धरणाची भिंत फुटल्याच्या दुर्घटनेकडे सोमवार, २९ जुलै रोजी संसदेच्या अधिवेशनातील शून्य प्रहर काळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. धरणाची भिंत फुटल्यामुळे आसपासच्या अनेक गावात धरणाचे पाणी घुसले होते. ब्रिटीशकालीन या धरणाची संरक्षक भिंत फुटल्याने परिसरातील गावांसह आजूबाजूच्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आसपासच्या परिसरात धरणाचे पाणी शिरल्याने भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले होते.

लाखो नागरिकांच्या जीवाला धोका

याच धरणातील पाण्याचा रेल नीर प्रकल्पासाठी वापर केला जातो. गेल्या वर्षीही या धरणाची दुरुस्ती करण्यात आली होती. यावर्षी सुध्दा मुसळधार पावसामुळे धरणाची संरक्षक भिंत फुटली आहे. भविष्यात हे धरण फुटल्यास बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी आदी शहरात पाणी घुसून येथे राहत असलेल्या लाखो नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे सातत्याने होत असणारे धरणाचे नुकसान टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने याकडे गंभीरतेने पाहत तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी शून्य प्रहर काळात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -