मोदी आणि शहा यांचे गुणगाणगात खासदार उदयनराजे भाजपात

Mumbai
नवी दिल्लीतील कार्यक्रमात अमित शहा यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सातार्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते उदयनराजे भोसले यांनी शनिवारी नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे या दिग्गज नेत्यांसह उदयनराजे भोसले यांचे समर्थक आणि भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जनतेच्या हितासाठी मी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी उदयनराजे यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशाला विकासाच्या मार्गावर नेत आहेत. त्यांनी लोकशाही मजबूत केली आहे. काश्मिरमधील कलम ३७० रद्द करण्याचा मोठा निर्णय या सरकारने घेतला आहे. भाजपाच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे मी प्रभावित झालो आहे. त्यामुळेच भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे उदयनराजे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारातूनच भाजपाचे सरकार काम करत आहे. त्यांच्या प्रेरणेतून यापुढेही हे काम सुरू राहिल. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत बहुमताने पुन्हा एकदा युतीचे सरकार येईल, असा विश्वास शहा यांनी या कार्यक्रमात केलेल्या भाषणात व्यक्त केला. उदयनराजे यांनी शुक्रवारी आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नव्याने निवडणूक होणार आहे. यावेळीही उदयनराजे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

उदयनराजे बालिश
उदयनराजे यांचे आचरट बालिश चाळे आमचे साहेब शरद पवार यांनी खपवून घेतले आणि हे करताना त्यांनी आपल्या जवळच्या माणसांना दुखावले, असे ट्वीट राष्ट्रवादी काँगेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.