मध्य प्रदेशसह ११ राज्याच्या पोटनिवडणुकांचे आज निकाल; या राज्यात भाजप पुढे

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासह देशात ११ राज्यांमध्ये पार पडलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज (मंगळवारी) लागणार आहे. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यातील अतितटीच्या लढाईत शिवराज सिंह चौहान यांनी बाजी मारली आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप पुढे आहे. भाजप २१ जागांवर आहे तर काँग्रेस ६ जागांवर आहे.

हरयाणामध्ये एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पुढे आहे. तर झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा प्रत्येकी एका जागेवर पुढे आहेत. मणिपूरमध्ये ५ जागांपैकी ३ जागांवर भाजप जिंकली आहे तर एका जागेवर पुढे आहे. तेलंगणामधील एका जागेवर भाजप पुढे आहे.

कर्नाटकमध्ये दोन्ही जागांवर भाजप पुढे

कर्नाटकमध्ये सत्तारुढ भाजप दोन्ही जागांवर पुढे आहेत. आर. नगर आणि शिरा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुकीचे ३ नोव्हेंबरला मतदान झाले. शिरा विधानसभा मतदार संघातून राजेश गौडा भाजपचे उमेदवार आहेत. तर आर. नगरमधून एन मुनिरत्न भाजपचे उमेदवार आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये ७ पैकी ६ जागांवर भाजप पुढे

उत्तर प्रदेशमध्ये ७ जागांवर पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार असून ६ जागांवर भाजप पुढे आहे.

गुजरातमध्ये भाजप सर्व जागांवर पुढे

गुजरातमध्ये ८ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यापैकी भाजपने १ जागा जिंकली असून ७ जागांवर पुढे आहे.

छत्तीसगडमध्ये एका जागेवर काँग्रेसचा बोलबाला

छत्तीसगडमध्ये एका जागेवर पोटनिवडणूक झाली होती. त्या जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे.