मुंबईकर पर्रीकर…

मनोहर पर्रीकर यांच्या संरक्षण मंत्री असतानाच्या आठवणी सांगणारा पत्रकार उदय जाधव यांचा लेख...

Mumbai
manohar parrikar defence minister

‘भारतीय राजकारणातील प्रज्ञावंत नेते मनोहर पर्रीकर यांचं निधन झालं. बातमी आली तसं मन सून्नं झालं… त्यांच्या सोबत झालेल्या गप्पा आणि चर्चा… मनात पुन्हा ताज्या झाल्या… गोव्याच्या मातीतले ते अस्सल मराठी व्यक्ती. त्यांचं जीतकं प्रेम गोयंवर… तीतकंच मुंबईवरही. त्यातही विशेष म्हणायचं तर कट्टर पार्लेकर… विद्यार्थी दशेत असताना वरळीच्या बीडीडी चाळीत त्यांचे वास्तव्यं होतं. पोद्दार गल्लीतील सार्वजनिक अभ्यास… तिथले सवंगडी… जांभोरी मैदानातील खेळ… नंतर मुंबई पवई आयआयटीचं कॅम्पस. मग विलेपार्ले त्यांचं हक्काचं निवासस्थान झालं. सत्तेत असो किंवा नसो… हनुमान रोडवर मोकळेपणानं चालणं काही त्यांनी सोडलं नाही. पार्ल्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं. अगदी देशाचे संरक्षण मंत्री असतानाही, त्यांनी पार्ल्यातील अनेक लहान सहान कार्यक्रमांना हजेरी लावली होती. पार्ल्यातील हनुमान रोडवर ते मित्रांशी बिनधास्त गप्पा मारायचे… भाजपचे जेष्ठ नेते असल्याचा कुठलाच बाऊ त्यांच्या अंगी कधीच नसायचा. ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ त्यांच्या अंगी बाणवलेली होती.

देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांना अनेकदा लष्करी तळांवर सैन्याची मानवंदना ‘गार्ड आॅफ आॅनर’ दिला जायचा. त्यावेळी त्यांच्या लष्करी शिस्तीत न बसणाऱ्या वेशभूषेबद्यल चर्चा व्हायच्या. हाफ शर्ट…साधी पँट, गळ्यात दोरीने लटकवलेला चष्मा आणि पायात चप्पल हिच त्यांची नेहमी वेशभूषा असायची. अगदी साऊथ ब्लाॅक मधील त्यांच्या कार्यालयातही विदेशातील संरक्षण मंत्र्यांच्या बैठकी वेळीही त्यांची हिच वेशभूषा असायची. काही आंतरराष्ट्रीय परीषदेत त्यांनी सहभागी होताना जोधपूरी सूट घातला होता. हेच काय ते त्यांचं वेशभूषेतील वेगळेपण होतं. बाकी माणूस साधा… आणि बुद्धीमान होता.

हे वाचा – उरी, सर्जिकल स्ट्राईक आणि मनोहर पर्रिकर

मनोहर पर्रीकर देशातील पहिले मुख्यमंत्री होते, जे आयआयटीचे विद्यार्थी होते. त्यामुळेच त्याचं मुंबई आयआयटीशी भावनिक नातं होतं. या संस्थेवर त्यांचं खूप प्रेम होतं. मुंबई आयआयटीच्या वार्षिक कार्यक्रमांनाही त्यांनी हजेरी लावलीय. तिथल्या विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्यात. तंत्रज्ञान प्रदर्शनातही त्यांनी चालत फिरून पाहणी केली. तिथे प्रोजेक्ट सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केलं आहे. जगात विकसित होणाऱ्या नॅनो टेक्नाॅलाॅजीबद्दल भरभरून बोलत असत. भारत कोणत्याच तंत्रज्ञानात मागे राहू नये, अशी त्यांची प्रखर इच्छा होती.

डिफेंन्स करस्पाँडंट म्हणून माझे त्यांच्याशी चांगले संबध निर्माण झाले. संरक्षण मंत्री झाल्यावर त्यांच्या समोर अनेक आव्हानं होती. भ्रष्ट्राचारांच्या आरोपांमुळे संरक्षण दलात नवीन आयुधांची खरेदी होत नव्हती. त्यामुळे संरक्षण दलात असणारी आयुधं क्षत्रू देशांच्या तूलनेत कालबाह्य ठरत होती. विरोधकांच्या आरोपांना भीक न घालता त्यांनी धाडसी निर्णय घेत एका मागोमाग अत्याधुनिक आयुधांचा लष्कराच्या भात्यात समावेश करण्यास सुरवात केली. नुसतीच सुरुवात केली नाही, तर मेक इन इंडिया अंतर्गत, विकत घेतलेल्या आयुधांची निर्मिती भारतातच सुरू करण्याची आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करून भारतीय लष्कर सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी विदेशातही भारताचं मजबूत नेतृत्व कणखरपणे दाखवून दिलं. त्याची चूणुक त्यांनी विशाखापट्टमला आयोजित केलेल्या इंटरनॅशनल फ्लिट रिव्हिव सोहळ्यात दाखवून दिली. जगभरातील विविध देशांचे नौदल या सोहळ्यात आपल्या सामरीक ताकदींचं प्रर्दशन करणार होते. भारत या आंतराष्ट्रीय सोहळ्याचा यजमान होता. अगदी आॅलंपीकच्या धर्तीवर या IFR सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रीकरांनी मराठी बाणा काय असतो याची पाकिस्तानला दूसऱ्यांदा ओळख करून दिली. (मराठी बाणाची पहिली ओळख एअर चिफ मार्शल अनिल टिपणीस यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान जनरल मूशर्रफ यांना कारगिल युद्धानंतर झालेल्या, आग्रा समिटच्या वेळी करून दिली होती. त्यावेळी पाहुणे पंतप्रधानांना लष्कराकडून मानवंदना देण्याची जबाबदारी एअर चिफ मार्शल अनिल टिपणीस यांच्यावर होती. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान जनरल मूशर्रफ यांना गार्ड आॅफ आॅनर देताना एअर चिफ मार्शल अनिल टिपणीस यांनी सॅल्यूट केला नाही. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान मीडियात मोठा वाद रंगला होता. पण टिपणीस सर आपल्या निर्णयावर ठाम होते. कारगिलच्या खलनायकाला सॅल्यूट नाही म्हणजे नाही. एअर चिफ मार्शल अनिल टिपणीस यांच्या या करारी मराठी बाण्याचं कौतुक त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः सामना वृ्त्तपत्रातून टिपणीसांना सॅल्यूट ठोकून केलं होतं.)

ही झाली पहिली ओळख आता दूसरी ओळख करून दिली ती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी. भारताने IFR चं आयोजन केलं ते विशाखापट्टटणमच्या समुद्रात… मात्र पाकिस्तान नौदल या ठिकाणी येण्यास राजी नव्हतं. त्याला कारण ही तसच होतं. १९७२ च्या भारत-पाकिस्तान यु्द्धात विशाखापट्टटणमच्या समुद्रातच पाकिस्तान नौदलाची पाणबूडी PNS
गाझीला भारतीय नौदलाने जलसमाधी दिली होती. त्यामुळे आमच्या जवानांची कबर असलेल्या जागेवर आम्ही येणार नाही अशी भूमीका पाकिस्तान ने घेतली. भारतीय नौदलाने ही PNS गाझीला जीथे बूडवली तिथेच पाकिस्तान नौदलाच्या युद्धनौकांना नांगर टाकण्यासाठी जागा दिली होती. त्यामुळे पित्त खवळलेल्या पाकिस्तानने IFR मध्ये सहभागी न होण्याची धमकी दिली. पाकिस्तानच्या या धमकीला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी भीक घातली नाही. उलट आपला मराठी बाणा दाखवत पाकिस्तानची विशाखापट्टणम समुद्रातील जागा तिच ठेवली. त्यामुळे संतप्तं झालेल्या पाकिस्तानने आपल्या नौदलाला IFR मध्ये सहभागीच होऊ दिलं नाही. विशाखापट्टनम डिफेन्स करस्पाँडंट म्हणून न्यूज कव्हरेज करताना पाकिस्तान नौदल कुठेच दिसलं नाही म्हणून आम्ही खूप विचारणा केली. पण नौदल अधिकारी या बद्दल काहीच सांगत नव्हते. त्यांनाही पाकिस्तानच्या अचानक गैरहजेरी बद्दल कल्पना नव्हती. हाच प्रश्न मी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांना पत्रकार स्नेह भोजनावेळी विचारला होता. पण त्यांनी त्या क्षणाला काहीच उत्तर दिलं नाही. मात्र भोजन कार्यक्रम आटोपल्यावर मनोहर पर्रीकरांनी जाताना माझ्या खांद्यावर हात ठेवून बाजूला नेलं आणि पडद्यामागची लढाई सांगितली. मग मलाही चेव चढला आणि तडक विशाखापट्टणमच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन पाकिस्तान नौदलाच्या गैरहजेरीचं खरं कारणं सांगणारा वाॅकथ्रू रिपोर्ट केला. तेंव्हा संरक्षण मंत्र्यांच्या या धडाकेबाज कामगिरीची बातमी ऐकून नौदल अधिकाऱ्यांचाही आत्मविश्वास उंचावला.

संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांची कामगिरी इथेच संपत नाही. उरी येथील आर्मी कँम्पवर झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार तडाखा देत पाक व्याप्तं काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. त्यातही संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रीकरांची भूमिका महत्वाची होती. पण नॅशनल सिक्रेटमुळे त्यावर जाहीरपणे लिहिता येत नाहीये. सर्जिकल स्ट्राईक यशश्वी झाला. पण त्याच्या दूसऱ्याच दिवशी आर्मीचा जवान चंदू चव्हाण सीमेवर पहारा देत असताना चूकून रस्ता विसरून पाक व्याप्तं काश्मीरमध्ये गेला आणि पाकिस्तानी जवानांच्या तावडीत सापडला. चंदू चव्हाणला सहिसलामत भारतात परत आणणं, हे खरं तर मोठंच आव्हान होतं. त्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय सोपस्कार पुर्ण करण्यात पर्रीकरांनी कोणतीच कसूर ठेवली नाही. पण या सर्व प्रक्रियेत पाकिस्तानने मुद्दामहून वेळकाढूपणा केला आणि अनेक दिवस चालढकल केली. त्याचा परीणाम असा झाला की भारतीय मीडिया चंदू चव्हाणला कधी परत आणणार यासाठी केंद्र सरकारला धारेवर धरू लागला. पण परीस्थिती अत्यंत नाजूक होती. सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकीस्तानचा चांगलाच जळफळाट झाला होता. त्यातच चंदू चव्हाण प्रकरण घडलं. दिवस वाढत गेले… तसे मीडियाचे प्रश्नंही वाढत गेले. त्यावेळी मुंबईत नौदलाच्या एका कार्यक्रमात संरक्षण मंत्री आले. झालं… सगळा मीडिया चंदूला कधी परत आणणार या प्रश्नांचा भडिमार करत होता. या सर्व प्रश्नांना डिप्लोमॅटिक उत्तरं देऊन पर्रीकर निघाले. वाटेतच मी ऊभा होतो… जाताना माझ्याकडे पाहीलं आणि खांद्यावर हात ठेवून नेहमी प्रमाणे बाजूला नेलं… आणि चंदू चव्हाण प्रकरणाची खरी कहाणी सांगितली. त्यानंतर मी सर्व डिफेंन्स पत्रकारांना वस्तूस्थिती किती नाजूक आहे, याची कल्पना दिली. काही दिवसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून चंदू चव्हाण सूखरूप भारतात परत आला. त्यामागे संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी सर्व ताकत पणाला लावली होती… एका जवानासाठी.

मनोहर पर्रीकरांची आणखी एक जिव्हाळ्याची आठवण… २०१६ साली मला डिफेंन्स करस्पाँडंट म्हणून सियाचेन ग्लॅशियर सेक्टर कव्हर करण्याची मोठी संधी मिळाली. त्यासाठी मी अनेक वर्ष प्रयत्नं करत होतो. पण सियाचेन सेक्टर सर्वाधीक अती संवेदनशील सीमा असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तिथे मिडीयाला परवानगी नाहीच आहे. तरी ही डिफेंन्स करस्पाँडंट म्हणून माझी ८ वर्षांची कामगिरी पाहून डिफेंन्स ने मला जाण्याची संधी दिली. सियाचेन ग्लॅशियर वर जाणंच किती आव्हानात्मक आहे. याची कल्पना संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रीकरांनी मला दिली. कारण तेही स्वतः तिथे जाऊन आले होते. आपल्या मुंबईकरांना तिथली थंडी सहन होणारी नाही, असा आपुलकीचा सल्लाही त्यांनी दिला. ज्या वातावरणात स्टिलचे नळ ही कडाक्याच्या थंडीने फुटतात. तीथे आपली हाडं ही फुटतात… असे अंगावर शहारे आणणारे अनुभव आर्मीतील अधिकारी सांगत होते. पण आर्मी आणि एअर फोर्सने आमची व्यवस्था उत्तम केली होती. त्यामुळेच सियाचेन ग्लॅशियर सेक्टर चांगल्या प्रकारे कव्हर करू शकलो.

मुंबईत परत आल्यावर १५ आॅगस्ट २०१६ स्वातंत्रदिनी माझा सियाचेन ग्लॅशियर कव्हरेज शो IBN लोकमत चॅनलवर दाखवला. मी आधीच शो ची वेळ सांगितल्यामुळे मनोहर पर्रीकरांनी पुर्ण शो टीव्हीवर पाहीला. शो पाहिल्यावर शाबासकीची थाप देण्यासाठी त्यांचा फोनही आला.
‘लेका पहिला मराठी रिपोर्टर आहेस तू… जो सियाचेन ग्लॅशियर सेक्टर मधील अगदी आतमधील कुमार पोस्टपर्यंत जाऊन कव्हरेज करून ईलंस. बेस केलंस शो… अभिनंदन तूझो… गोयंत ईलौ तर सांग वो… मासं खाऊक घालतो तूका…’ मनोहर पर्रिकर सरांचे हेच कौतुकाचे शब्दं आणि आठवणी आयुष्यभर हृदयात चिरंतन राहतील.

 


लेखक उदय जाधव हे न्युज १८ लोकमत वृतवाहिनीचे डिफेंन्स करस्पाँडंट आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here