चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, मुलासह रात्रभर पती बसला मृतदेहाच्या बाजूला

murder case
प्रातिनिधिक छायाचित्र

दिल्लीत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आपल्या पत्नीची साडीने गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. एवढेच नव्हे तर नंतर आरोपी पती आपल्या दीड वर्षाच्या मुलाला घेऊन रात्रभर मृतदेहाजवळ बसून राहिला. पहाटे आरोपींनी लोकांना खोटं कारण सांगून फसवण्याचा प्रयत्न केला पण अखेर तो पकडला गेला.

आजूबाजूच्या लोकांना संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलवले. यानंतर पोलिसांनी कडक कारवाई केली असता आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. दिल्लीतील बक्करवाला भागात लेबर कॅम्प येथील ही घटना आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपीचे नाव मजीद असून तो २१ वर्षांचा आहे आणि महिलेचे नाव शाबिला खातून असून ती २१ वर्षांची होती.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी मजीदचे काल रात्री आपल्या पत्नीशी भांडण झाले आणि त्याने रागाच्या भरात पत्नीचा साडीने गळा दाबला. यानंतर तो रात्रभर आपल्या पत्नीच्या मृतदेहाजवळ आपल्या दीड वर्षाच्या मुलाला घेऊन बसून राहिला. सकाळी मजीदने आजूबाजूच्या लोकांना सांगितले की, रात्री बायकोला जास्त ताप आला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. पण लोकांना हे कारण न पटल्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार केली.

पोलिसांना माहिती मिळताच, फॉरेन्सिक तपासणीनंतर महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आणि गुन्हा नोंदविला गेला. माजिदकडे चौकशी सुरू केली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवल्यावर आरोपी मजीद घडाघडा बोलू लागला. मजीदने पोलिसांना सांगितलं की आपल्या पत्नीचे दुसऱ्या पुरूषाबरोबर संबंध होते त्यामुळे आमच्यात भांडणं झाले. या रागात मी पत्नीची हत्या केली.


हे ही वाचा – Video : लॉकडाऊनमुळे ७ महिन्यांनंतर झाली ‘या’ प्रसिध्द खेळाडू पती- पत्नीची भेट!