पंतप्रधान मोदींचे नाव घेता न आल्यामुळे मुस्लिम युवकाला मारहाण
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव व्यवस्थितरित्या घेऊ न शकल्याने, काही समर्थकांनी एका मुस्लिम तरुणाला चक्क मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये एका चालत्या ट्रेनमध्ये हा प्रकार घडल्याचे समजते.
काय आहे हे प्रकरण ?
पश्चिम बंगालमधील एक मुस्लिम तरुण १४ मे रोजी ट्रेनमधून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्या तरुणांचा अन्य चार युवकांशी एका गोष्टीवरुन वाद झाला. बाचाबाचीमध्ये या चौघांनी त्या मुस्लिम तरूणाला पंतप्रधान आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्याची नावे विचारली. मात्र, तो ती दोन्ही नावे व्यवस्थित सांगू न शकल्याने अन्य चार युवकांनी त्याला चालत्या ट्रेनमध्येच मारहाण करायला सुरुवात केली. इतकेच नाही तर त्याच्यावर ‘भारत माता की जय’ आणि राष्ट्रगीत म्हणण्याची जबरदस्तीही केली. उपलब्ध माहितीनुसार, ही घटना हावडा ते बंदेल रेल्वे स्थानकांदरम्यान घडली.
नवाज शरीफ विषयीही केली विचारणा
जमाल मोमिन नामक या मुस्लिम तरुणाला युवकांनी पंतप्रधान आणि राष्ट्रगीताविषयी विचारुन झाल्यावर, नवाज शरीफ यांच्याबद्दल विचारणा केली. तसंच जमालला तो नियमितपणे नमाज पडतो का असेही विचारले. यावर जमालने नाही असे उत्तर देताच, ”तू मुसलमान असून तुला या गोष्टी माहित नाहीत, याची तुला लाज वाटली पाहिजे,” असे उद्गार त्यांनी काढले.
व्हायरल व्हिडीओमुळे मारहाण करणारे अटकेत
दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओच्या मदतीनेच पोलीसांनी मारहाण आणि दमदाटी करणाऱ्या चारही तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुस्लिम तरुण जमाल मोमिनलाही त्या चौघांची ओळख पटली आहे.