करकरेंना माझा शाप भोवला

साध्वी प्रज्ञा सिंहमुळे भाजपची झाली गोची

Mumbai
PRADNYA SINGH THAKUR
PRADNYA SINGH

माजी एटीएएसप्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर अडचणीत सापडल्या आहेत. देशभरातून प्रज्ञा यांच्यावर टीकेची राळ उठल्यामुळे भाजपची मोठी अडचण झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःबरोबर उमेदवारी देणार्‍या सत्ताधारी पक्षाची गोची केली आहे. प्रज्ञा यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. याशिवाय आयपीएस असोसिएशननेही साध्वीच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.

येथील एका कार्यक्रमात बोलताना प्रज्ञा यांनी करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. ’हेमंत करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवलं होतं. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळं झाला आहे. माझ्या विरोधात पुरावे नसतानाही मला तुरुंगात ठेवले. करकरे यांनी मला सुरुवातीपासून सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. हा देशद्रोह होता, धर्मद्रोह होता. मी त्यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. मी खूप त्रास सहन केला. मी ज्या दिवशी तुरुंगात गेले, त्या दिवशी सुतक सुरू झाले आणि ज्या दिवशी करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले, त्या दिवशी सुतक संपले’.’ ते मला विचारायचे की खरे जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावे लागले का? यावर मी म्हटले की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. त्यांनी मला शिवीगाळ केली. करकरे यांनी मला खोट्या गुन्हयात अडकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा आयोगाचा एक तपास अधिकारी यांनी करकरे याना बोलावून पुरावे नसताना प्रज्ञा यांना तुरुंगात का डांबले असे विचारले. त्यावर मी काहीही करेन, पण साध्वी विरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही’, असेही प्रज्ञा यावेळी म्हणाल्या.

भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी २६/११च्या हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याची तक्रार आमच्याकडे आली असून त्याविषयी अधिक तपास सुरू आहे, असे मध्यप्रदेशच्या मुख्य निवडणूक पदाधिकार्‍याने म्हटले आहे. त्यामुळे साध्वी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे आयपीएस असोसिएशननेही साध्वीच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. करकरे यांना त्यांच्या बलिदानाबद्दल अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. मात्र साध्वीने त्यांच्यावर टीका करून शहिदांचा अवमान केला आहे, असं ट्विट आयपीएस असोसिएशनने केलं आहे. असोसिएशनच्या या ट्विट्सला देशातील नागरिकांनी लाइक करतानाच हे ट्विट मोठ्या प्रमाणावर शेअर केले आहे.