घरदेश-विदेशमृत्यूचं गूढ उलगडलं?

मृत्यूचं गूढ उलगडलं?

Subscribe

ओंकार काळे –
सुनंदा पुष्कर यांचा खून झाला की ती आत्महत्या होती? या मागे कोण होतं ? आदी प्रश्नांमुळे सुनंदा आणि त्यांचे पती शशी थरूर या दोघांचीही वैयक्तिक आयुष्यं पूर्णतः ढवळून निघाली. अलिकडे समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारावर सुनंदा यांनी आत्महत्या केली असून त्यासाठी थरूर यांनी त्यांना प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्युला चार वर्षं चार महिने उलटून गेले आहेत. दक्षिण दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलमधील ३४५ क्रमांकाच्या खोलीत सुनंदा पुष्कर उतरल्या होत्या. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याशी त्यांचा २०१० मध्ये विवाह झाला होता. मात्र त्यांच्याशी झालेल्या भांडणानंतर घर सोडून त्या हॉटेलमध्ये येऊन राहिल्या होत्या. १७ जानेवारी २०१४ च्या संध्याकाळी हॉटेलच्या त्याच खोलीत सुनंदा यांचा मृतदेह आढळला आणि सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढत गेलं. सुरुवातीला त्यांचा खून झाला असावा असा संशय व्यक्त झाला. त्याला कारणंही तशीच होती. परंतु खुनी व्यक्तीचा कोणताही धागादोरा सापडत नव्हता. आता मात्र पोलीस ती आत्महत्याच असली पाहिजे, अशा निष्कर्षाप्रत आले आहेत. सुनंदा यांचा छळ केला गेला आणि त्यांना नैराश्यावस्थेत आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं. त्याला शशी थरूरच जबाबदार असल्याचा आरोप आता दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. या तपासासाठी पोलिसांना तब्बल १,५७७ दिवस लागले. तीन पोलीस आयुक्तांच्या कारकिर्दीत या प्रकरणाचे धागेदोरे तपासले गेले. यासाठी अमेरिकेच्या एफबीआयची मदत घेण्यापासून ब्लॅकबेरी या फोन कंपनीशी संपर्क साधण्यात आला. शिवाय मानसशास्त्रज्ञांची मदत घेण्यात आली.

- Advertisement -

जगण्याची इच्छा नाही… सुनंदाची मेलवर खुलासा

या संपूर्ण कालावधीत संशयाची सुई सातत्याने शशी थरूर यांच्याकडे वळत राहिली. त्यांचे वैयक्तिक सचिव अभिनव कुमार या आयपीएस अधिकाऱ्यासह त्यांच्या आठ कौटुंबिक मित्रांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. यामध्ये संजय देवन, एस. के. शर्मा, विकास अहलावत आणि सुनिल टक्रु यांचा समावेश होता. या छाप्यांमधून महत्त्वाचे पुरावे हाती आल्याचं पोलिसांनी आता स्पष्ट केलं आहे. आपण फसवलो गेलं असून आपला छळ होत असल्याचं सुनंदा पुष्कर यांना वाटत असल्याचा महत्त्वाचा मेल पोलिसांना सापडला. दुबईहून सुनंदा यांनी पाठवलेल्या एका मेलमध्ये ‘मला जगावंसं वाटत नाही’ असं म्हटलं होतं. थरूर यांच्या कृती, सुनंदा यांची मानसिक अवस्था आणि त्यामुळे त्यांनी चिंताग्रस्ततेच्या विकारावर दिलं जाणारं अल्प्राझोलॅम हे औषध मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे हे घडलं, असा निष्कर्ष काढण्यासाठी सायकॉलॉजिकल ऑटॉप्सीचा आधार घेण्यात आला. थरूर आणि त्यांच्या इतर निकटवर्तीयांवर ही मानसशास्त्रीय चाचणी घेण्यात आली. हे तंत्र तुलनेत नवीन आहे. एफबीआय आणि सीबीआय यांनी या चाचण्या घेतल्या. सुनंदा यांची प्रवृत्ती आत्महत्येकडे झुकणारी होती आणि त्यांचं वर्तन स्वतःला हानी करून घेण्याचं होतं, असंही या तपासातून पुढे आलं.

- Advertisement -
पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार

मेहेर तरार, कॅटीयासोबत शशी थरूरचे संबंध 
पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार आणि कॅटीया नावाच्या आणखी एक महिलेशी थरूर यांच्या चालणाऱ्या प्रणयचेष्टांमुळे सुनंदा खूप दुखावल्या गेल्या होत्या, असंही आरोपपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. सुनंदा आणि थरूर यांच्यामधील डिलीट करण्यात आलेलं संभाषण हाती लागावं यासाठी २०१६ मध्ये कॅनराडाच्या न्याय विभागाला विनंती करण्यात आली. त्याचाही यासाठी मोठाच उपयोग झाला आहे. सुनंदा यांच्या मृत्यूपूर्वीच्या रात्री थरूर यांनी केलेल्या हिंस्र मारहाणीमुळे त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या, असं या आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे. याखेरीज त्यांच्या शरीरावर इंजेक्शन दिल्याची खूण होती. दिल्लीला येण्यापूर्वी त्यांनी केलेल्या रक्ताच्या चाचणीमुळे ही खूण निर्माण झाली होती अशी माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली आहे.

अमेरिकन एजन्सीलाही निदान करता आले नाही 

व्हिसेराच्या चाचण्या घेण्यासाठी ‘एफबीआय’ला नऊ महिने लागले. आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे पुरेशा प्रमाणात नमुना दिला गेला नसल्यानं या चाचण्या करणं अवघड असल्याचं ‘एम्स’नं सांगितलं होतं. अमेरिकन एजन्सीला सुनंदा यांचा मृत्यू नेमका कोणत्या विषामुळे झाला ते निश्चित करता आलं नाही, मात्र त्यांच्या शरीरात किरणोत्सर्गी द्रव्याची अनैसर्गिक पातळी असल्याचा दावा साफ धुडकावून लावला. दिल्ली पोलिसांनी ‘लीला पॅलेस’ हॉटेलचं सीसीटीव्ही फूटेजही तपासलं. त्यावरून सुनंदा यांच्या खोलीत कोणतीही संशयित व्यक्ती शिरली नसल्याचं स्पष्ट झालं. मात्र तरीही सुनंदा यांच्या मृत्यूविषयी आणखीही काही संशयास्पद बाबी आहेत.

ऑटॉप्सीच्या अहवालानुसार सुनंदा यांचा मृत्यू अचानक आणि अनैसर्गिक आहे आणि तो औषधातील विषारी द्रव्यांमुळे झाला होता. व्हिसेराच्या अहवालानुसार त्यांच्या शरीरात विष आढळलेलं नाही. अलप्रॅक्सचा मागमूसही नव्हता. एफबीआयच्या अहवालानुसार विषबाधा हेच मृत्यूचं कारण असून पाठवलेल्या व्हिसेऱ्याचं प्रमाण कमी असल्यानं त्या विषाचं नाव सांगता येणं शक्य नाही. एम्सच्या अंतिम वैद्यकीय अहवालानुसार विषबाधेमुळेच मृत्यू झाला असून हे विष तोंडावाटे गेलं असेल किंवा इंजेक्शनद्वारे दिलं गेलं असावं. या ठिकाणी आणखी काही प्रश्न निर्माण होतात. डॉक्टरांनी सुनंदा यांना अल्प्रॅक्स गोळ्या घेण्यास सांगितलेलं नसतानाही त्या गोळ्या त्यांच्या खोलीत कशा काय आल्या? त्यांच्या शरीरावर १५ जखमा आढळल्या. त्यांपैकी १० क्रमांकाची खूण ही इंजेक्शनची खूण होती. ती रक्ताच्या चाचणीमुळे झालेलीच खूण होती का? त्या प्रतिसाद देत नसल्याचं आढळल्याबरोबर त्यांना तातडीनं रुग्णालयात का नेण्यात आलं नाही? त्याऐवजी खासगी डॉक्टरला का बोलावलं गेलं? पोलिसांना १०० क्रमांकावर फोन करून का बोलावण्यात आलं नाही?

जेसिका लाल खून प्रकरणातील पोलिस अधिकारीच याही केसवर 
आणखी एक योगायोग असा की, जेसिका लाल खून खटल्याच्या वेळी डीसीपी असलेले विवेक गोगीया आणि ठाणे अंमलदार इन्स्पेक्टर सुरेंदर शर्मा यांच्यावर बनावट तपासाचा ठपका ठेवण्यात आला होता. हेच दोघं सुनंदा मृत्यू प्रकरणाच्या वेळीही तपास अधिकारी होते. फक्त यावेळी गोगीया जॉइंट सीपी आणि शर्मा एरिया एसीपी होते. यावेळीही तपासात दिरंगाई होत असल्याबद्दल बरीच चर्चा झाली. या प्रकरणी नेहमीप्रमाणे तपासाच्या प्रक्रिया पाळल्या गेल्या नाहीत. उलटपक्षी, ‘वरून’ आदेश येतील तसा तपास केला गेला असं तपासकामात सहभागी एका स्रोतानं एका प्रमुख वृत्तपत्राला माहिती देताना स्पष्टपणे म्हटलं आहे.

पोलीसप्रमुख बस्सी यांनी हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे सोपवलं
या प्रकरणी झालेला तपासही सुरुवातीपासूनच वेळोवेळी संशयास्पद ठरत गेला. शशी थरूर यांचा फोन लगेच सील करण्याऐवजी आयजी दर्जाच्या एका अधिकाऱ्यानं त्यांना तो दिल्याचा आरोप करण्यात आल्यापासूनच या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरून थरूर यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्यानंतरही त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. तत्कालीन पोलीसप्रमुख बी. एस. बस्सी यांनी हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे सोपवलं आणि काही तासांमध्ये पुन्हा स्वतःकडे घेतलं. त्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला. क्राईम ब्रांचला खुनाचा गुन्हा दाखल करायचा होता असं सांगितलं जातं.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -