मला मोदींचा फोन केव्हा येणार? इच्छूक खासदारांचा जीव टांगणीला

आज सायंकाळपर्यंत नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सदस्यांची नावे समजण्याची शक्यता आहे.

narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा उद्या गुरूवारी शपथविधी संपन्न होत असून नव्या मंत्रिमंडळात कोण असावेत यासंदर्भात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि सध्या काळजीवाहू पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांची तब्बल पाच तास बैठक झाली आहे. त्यात मित्रपक्षांना देण्यात येणाऱ्या जागांचाही समावेश आहेत. दरम्यान महाराष्ट्रात कॅबिनेटसाठी इच्छूक असलेल्या अनेकांना ‘मोदींचा फोन केव्हा येतो’? याची उत्सुकता लागलेली आहे. आज सायंकाळपासून नरेंद्र मोदी हे स्वत: संभाव्य मंत्र्यांना फोन करणार असल्याचे समजते.

सर्व सूत्रे मोदीशाहांकडे

मागील आठवड्यात राज्यातील काही इच्छूकांनी पक्षाध्यक्ष अमित शाह, पक्षाचे सरचिटणीस रामलाल, राजनाथसिंह, राम माधव यांच्यासारख्या वजनदार नेत्यांच्या दिल्लीत भेटी घेतल्या. संभाव्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती. माय महानगरला मिळालेल्या माहितीनुसार यात काही दिग्गज भाजपा नेत्यांचाही समावेश होता. एका ज्येष्ठ खासदाराच्या निकटवर्तीयाने नाव प्रसिद्‌ध न करण्याच्या अटीवर सांगितले की आमचे साहेब केंद्रीय मंत्रिमंडळात जाण्यास इच्छूक आहेत, पण मोदी आणि अमित शाह काहीच बोलत नाही. कुणाला काही सांगतही नाही. त्यांनी सर्वच सूत्रे आपल्या हाती ठेवली आहेत. त्यामुळे काय होतंय याची काळजी आणि उत्सूकताही आम्हाला आहे.

फार बदल नाहीत?

यंदाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजपाचे ८ आणि शिवसेनेच्या २ मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. त्यात नितीन गडकरी, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर, डॉ. सुभाष भामरे यांची नावे कायम राहण्याची शक्तता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रीमंडळात फार बदल केले जाणार नाहीत. त्यामुळे कदाचित पूर्वीचेच मंत्री कायम राहतील. अरूण जेटली यांना तब्येतच्या कारणामुळे कदाचित मंत्रीपद दिले जाणार नाही. असे असले तरी अलिकडेच त्यांनी अर्थमंत्रालयांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. यंदा अर्थ मंत्रालय, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयात काही बदल होऊ शकतो. पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्ये भाजपाला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे तेथील प्रतिनिधींना मंत्रिमंडळात आवर्जून स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.