Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश दोन दिवसांतच 'गोडसे ज्ञानशाळा' बंद; प्रशासनाने टाळं ठोकत साहित्य केलं जप्त

दोन दिवसांतच ‘गोडसे ज्ञानशाळा’ बंद; प्रशासनाने टाळं ठोकत साहित्य केलं जप्त

Related Story

- Advertisement -

अखिल भारतीय हिंदू महासभेने दोन दिवसांपूर्वी सुरु केलेल्या महात्मा गांधी यांचा हत्यारा नथूराम गोडसे याच्या नावाने सुरु केलेलं ग्रंथालय दोन दिवसातच बंद करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाने गोडसे ज्ञानशाळेला टाळं ठोकत साहित्य जप्त केलं आहे. प्रशासनाने कलम १४४ लागू करत अशा प्रकारचं आयोजन करता येत नाही, असं सांगितलं. दोन दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील आपल्या कार्यालयात अखिल भारतीय हिंदू महासभेने गोडसे ज्ञानशाळा नावाचं वाचनालय सुरू केलं होतं.

हिंदू महासभेची गोडसे ज्ञानशाळा दोन दिवसातच बंद केली. वाचनालयातील साहित्य जप्त करण्यात आलं आहे. कायदा-सुव्यवस्था कायम रहावी यासाठी जिल्हाप्रशासनाने ही कारवाई केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या नावानं उघडलेल्या या वाचनालयामुळे परिसरात तणावाचं वातावरण परसलं होतं. कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी परिसरात कलम १४४ लागू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे वाचनालय बंद करण्यात आलं, अशी माहिती ग्वाल्हेरचे पोलीस अधिक्षक अमित संघी यांनी दिली. “हिंदू महासभेच्या सदस्यांसमवेत बैठक झाली आणि ज्ञानशाळा बंद करण्यात आली. सर्व साहित्य, पोस्टर्स, बॅनर व इतर साहित्य जप्त केले, ” असं संघी यांनी सांगितलं.

- Advertisement -

गोडसे ज्ञानशाळा बंद केल्यानंतर हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी प्रतिक्रिया दिली. आमचा उद्देश पूर्ण झाला. आम्ही राष्ट्रभक्त आहोत. शहरात शांतता नांदावी यासाठी गोडसे ज्ञानशाळेला बंद करतोय. मात्र, राष्ट्रहिताशी संबंधित कार्यक्रम होतच राहतील, असं भारद्वाज म्हणाले.

 

- Advertisement -