घरदेश-विदेशदेशातली पहिल्या महिला पक्षाची दिल्लीत स्थापना!

देशातली पहिल्या महिला पक्षाची दिल्लीत स्थापना!

Subscribe

देशातल्या पहिल्या महिला पक्षाची स्थापना राजधानी दिल्लीमध्ये झाली असून राष्ट्रीय महिला पार्टी अर्थात नॅशनल वुमन पार्टी असं या पक्षाचं नाव आहे.

भारताच्या मुख्य राजकीय प्रवाहामध्ये महिला राजकीय नेत्यांचं प्रमाण पुरुष राजकारण्यांच्या मानाने कमी असल्याचं नेहमीच दिसून आलं आहे. अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ७२ वर्षांमध्ये महिला राजकीय नेत्यांचं प्रमाण कालानुरूप वाढत जरी असलं, तरी ते कमीच राहिलं आहे. ३३ टक्के महिला आरक्षणाच्या निर्णयाचा देखील फारसा परिणाम दिसून येत नसल्याचंच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये फक्त महिलांची अशी ‘नॅशनल वुमन्स पार्टी’ अर्थात एनडब्ल्यूपीची स्थापना करण्यात आली आहे. देशाच्या संसदेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व ५० टक्के करणं हा या पक्षाचा मुख्य उद्देश आहे.

संसदेत हव्या ५० टक्के महिला!

अवघ्या ३७ वर्षांच्या श्वेता शेट्टी यांनी या पक्षाची स्थापना केली आहे. ‘भारतातल्या सध्याच्या पुरूषसत्ताक राजकीय व्यवस्थेमध्ये खास महिलांसाठीच्या आणि महिलांच्या पक्षाची आवश्यकता होती. देशात महिलांचे प्रश्न आणि त्यांचं महत्त्व फक्त मातृदिन, महिला दिन किंवा मग फार तर निवडणुकांच्या वेळी पाहिलं जातं. पण एनडब्ल्यूपी हे महिलांना त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं एक व्यासपीठ असेल’, असं शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. ‘२०१२मध्येच आम्ही आमच्या पक्षाचं काम सुरू केलं होतं. लोकसभा निवडणुकांमध्ये महिलांसाठी ५०टक्के जागा आरक्षित करण्याचं आमचं लक्ष्य असेल. त्यासाठी पक्षाच्या नोंदणीची कार्यवाही आम्ही सुरू केली आहे,’ असं देखील शेट्टी यांनी सांगितलं.

- Advertisement -

१ लाख ४५ हजार महिलांचा पाठिंबा!

दरम्यान, या राष्ट्रीय महिला पक्षामध्ये कोणतंही मोठं नाव सध्या तरी नसलं, तर पक्षाला हैदराबादमधल्या तेलंगणा महिला समितीच्या सुमारे १ लाख ४५ हजार महिलांचा पाठिंबा असल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे. तसेच, ‘ज्या महिलांना आमच्या पक्षावर विश्वास आहे, महिलांची स्थिती सुधारण्यात पक्ष महत्त्वाची भूमिका निभावू शकतो अशा महिलांनी पक्षाची सदस्यनोंदणी करावी,’ असं आवाहन देखील शेट्टींनी यावेळी केलं. तेलंगणामध्ये शेट्टी एक एनजीओ देखील चालवत असून सिस्टीम बदलण्यासाठी सिस्टीमचा हिस्सा व्हावं लागेल असा विश्वास त्यांना वाटतो.


तुम्ही हे वाचलंत का? – भाजप ठरला सर्वात श्रीमंत पक्ष

‘…तोपर्यंत आम्ही थांबणार नाही’

२०१९च्या लोकसभा निवडणुका लढवण्याचं लक्ष्य शेट्टींनी समोर ठेवलं आहे. जोपर्यंत संसदेमध्ये ५० टक्के महिला दाखल होत नाहीत, तोपर्यंत थांबणार नसल्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, ‘ज्या इतर पक्षांना आमचं म्हणणं पटतंय अशा पक्षांनी आम्हाला पाठिंबा द्यावा’, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -