निर्भयाच्या दोषीचे चोचले, म्हणे, ‘मला तुरुंगात नीट वागणूक मिळत नाही’!

तुरुंगात निर्भयाचा दोषी असलेल्या विनय शर्माला स्क्रिझोफ्रेनिया असल्याचा दावा त्याच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.

New Delhi
Nirbhaya case
फाशी नको, आजीवन कारावास द्या; निर्भयाच्या दोषीची मागणी

निर्भयाच्या चारही दोषींना येत्या ३ मार्च रोजी फाशी देण्याचं तिसरं डेथ वॉरंट दिल्लीतल्या पतियाला कोर्टाने जारी केलं आहे. त्यामुळे आता तरी या चार नराधमांना फाशी होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच दुसरीकडे त्यातलाच एक असलेल्या विनय शर्मा या दोषीच्या वकिलांनी दिल्ली कोर्टामध्ये तुरुंग प्रशासनाविरोधात याचिका दाखल केली आहे. ‘विनय शर्माची प्रकृती बरी नसून त्याच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली आहे. तसेच त्याला स्क्रिझोफ्रेनिया हा आजार देखील झाला आहे. त्यामुळे त्याला तुरुंग प्रशासनाकडून योग्य वागणूक दिली जावी’, अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे.

विनय शर्माला स्क्रिझोफ्रेनिया!

दिल्लीतील अतिरिक्त सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर न्यायमूर्ती धर्मेंद्र राणा यांनी जेल प्रशासनाला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ‘विनय शर्मा आता त्याच्या आईलाही ओळखेनासा झाला आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे. प्लास्टर लागलं आहे. तसेच त्याचं मानसिक स्वास्थ्य ठीक नसून त्याला स्क्रिझोफ्रेनिया आजार झाला आहे. त्याची झोपही पूर्ण होत नाही’, असा दावा या याचिकेमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, यावर तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, ३ नंबरच्या तुरुंगात रविवारी दुपारी हा प्रकार घडला. विनय शर्माने त्याचं डोकं तुरुंगातल्या भिंतीवर आपटून घेतलं. त्यानंतर त्याच्यावर तुरुंगातच उपचार करण्यात आले.

दोनदा रद्द झालं डेथ वॉरंट

१७ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीमध्ये पतियाळा न्यायालयाने मुकेश कुमार सिंह (३२), पवन गुप्ता (२५), विनय शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंह (३१) या चौघांना फाशी देण्यासाठी तिसऱ्यांदा डेथ वॉरंट काढलं आहे. येत्या ३ मार्च रोजी या तिघांना फाशी दिली जाणार आहे. याआधी दोनदा त्यांनी राष्ट्रपतींकडे केलेल्या दया याचिकेमुळे आणि सर्वोच्च न्यायालयात केलेल्या फेरविचार याचिकेमुळे त्यांचं डेथ वॉरंट दोन वेळा रद्द झालं आहे.


वाचा सविस्तर – निर्भया केस : आरोपी विनय शर्माने भिंतीवर डोकं आपटून केला आत्महत्येचा प्रयत्न!