पक्षाच्या खराब कामगिरीमुळे नितीश कुमारांचं मुख्यमंत्रिपदावरुन मन उडालं, भाजपकडून मनधरणी

nitish kumar upset on party performance bjp persuades him to stay Bihar CM

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी नितीश कुमार यांच्या जनता दलाची कामगिरी निराशजनक झाली आहे. त्यामुळे नितीश कुमार नाराज असल्याचे समजतेय. नाराज झालेल्या नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला नकार दिला आहे. भाजपकडून त्यांची मनधरणी सुरु आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याबाबतचे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ ने दिले आहे.

बिहार निवडणुकीत NDA मधील भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजप आनंदोत्सव साजरा करत आहेत. तर दुसरीकडे स्वत:ला मोठा भाऊ असा प्रचार करणारा जदयूमध्ये नाराजीचे वातावरण आहे. २००५ मध्ये सत्तेत आल्यानंतर १५ वर्षानंतर निवडणुकीत जयदूची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यामुळे नितीश कुमार नाराज असून मुख्यमंत्रीपदात रस नसल्याचे बोलून दाखवले, असे जदयूच्या कार्यकर्त्याने द इंडियन एक्सप्रेसशी खासगीत सांगितले. नितीश यांनी आता मुख्यमंत्रिपदात रस नसल्याचे सांगितल्यानंतर भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या नेत्यांनी नितीश यांची समजूत काढली. ‘जदयू’ला कमी जागा मिळाल्या असल्या तरी तुम्हाला सरकार चालवताना पूर्वीप्रमाणेच पूर्ण स्वातंत्र्य असेल, अशी हमी भाजपच्या नेत्यांनी नितीश यांना दिल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग पासवान यांच्या ‘लोजप’ने ज्याप्रकारे संयुक्त जनता दलाचे नुकसान केले आहे, त्याचा मोठा धक्का नितीश यांना बसला आहे. जवळपास २५ ते ३० जागांवर चिराग पासवान यांनी ‘जदयू’चे गणित बिघडवून टाकले. परिणामी ‘जदयू’ला गेल्या १५ वर्षात प्रथमच इतक्या कमी जागा मिळाल्या आहेत. ही गोष्ट नितीश यांच्या मनाला चांगलीच लागली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना आता मुख्यमंत्रिपदी बसण्याची इच्छा उरलेली नाही. मात्र, भाजपच्या नेत्यांकडून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपने चिराग पासवान यांच्या ‘लोजप’वर अंकुश ठेवला नाही. याशिवाय, भाजप आणि ‘जदयू’च्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. परिणामी अनेक जागांवर ‘जदयू’च्या उमेदवारांचा पराभव झाला. जय कुमार सिंह, शैलेश कुमार, कृष्णनंदन वर्मा, रामसेवक सिंग, संतोष निराला, खुर्शिद आलम हे ‘जदयू’चे बडे नेते ‘लोजप’मुळे हारले.