जिंकल्यावर मिरवणूक काढू नका; तेजस्वी यादवची पक्षातील उमेदवारांना ताकीद

Tejashwei yadav bihar election
तेजस्वी यादव

राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी आता आरजेडीच्या उमेदवारांना सक्त ताकीद दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारची निवडणूक लढली गेली. तीन टप्प्यात झालेल्या या निवडणुकीच्या मतदानानंतर सर्वच एक्झिट पोलनी आरजेडीच्या पारड्यात बहुमत टाकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विजयी झाल्यानंतर आरजेडीच्या उमेदवारांनी विजयी मिरवणुका काढू नयेत. जल्लोष जनतेनी करावा आणि उमेदवारांनी आपल्या साधेपणाचे उदाहरण द्यावे, असा संदेश सर्व उमेदवारांना दिला आहे.

तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, उमेदवारांनी निकालाच्या दिवशी आपल्याच मतदारसंघात थांबावे. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच बिहारची राजधानी पटनाकडे रवाना व्हावे. मात्र विजयानंतर स्वतः कोणत्याही मिरवणुकीत किंवा जल्लोषात सामील होऊ नये. तेजस्वी यादव यांचा हा संदेश सर्व उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यासाठी चार लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये, सुनील सिंह, संजय यादव, श्याम रजक आणि जगदानंद सिंह सहभागी आहेत.

सर्वच एक्झिट पोलनी आरजेडीला विजयाचे दावेदार घोषित केल्यानंतर आरजेडी पक्षाच्या पटना येथील कार्यालयात लगबग सुरु झाली आहे. कार्यालयात साफ-सफाई पासून ते छोटी मोठी डागडुजी करण्याचे काम जोरात सुरु आहे. आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह म्हणाले की, या निवडणुकीत जनतेचा विजय झाला आहे, त्यामुळे जनताच जल्लोष साजरा करेल. जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत कोणताही उमेदवार मतमोजणी केंद्र सोडणार नाही. यासोबतच ९ नोव्हेंबर रोजी तेजस्वी यादव यांचा जन्मदिन देखील आहे. त्यामुळे हा दिवस देखील कार्यकर्त्यांनी शांतपणे साजरा करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

आज तक एक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलने नितीश कुमार यांना ६९ ते ९१ जागा दिल्या आहेत. तर तेजस्वी यादवच्या महाआघाडीला १३९ ते १६१ जागा. चिराग पासवान यांच्या लोजपला ३ ते ५ जागा मिळण्याचे चिन्ह आहेत.