कर्नाटक विधानसभेत कानडी शिमगा!

कर्नाटक विधानसभेतली अशांतता तिसऱ्या दिवशी देखील कायम असून आजचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल्यामुळे आता थेट सोमवारीच कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी अजून २ दिवसांचा कालावधी मिळाला आहे.

Bangalore
Karnataka Assembly Chaos
कर्नाटक विधानसभेतला अभूतपूर्व राडा

गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेला राजकीय तमाशा काही संपायचं नाव घेत नाहीये. शुक्रवारी कर्नाटकमधल्या कुमारस्वामी सरकारला राज्यपालांच्या आदेशांनुसार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणं क्रमप्राप्त असताना आजदेखील हे बहुमत सिद्ध झालेलं नसून सभागृह अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केल्यामुळे आता थेट सोमवारी सकाळी ११ वाजताच सभागृह सुरू होणार आहे. त्यामुळे हा विश्वासदर्शक ठराव तेव्हाच मांडला जाऊ शकेल. दरम्यान, याआधी स्वत: कुमारस्वामींनीच येडीयुरप्पांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केल्यामुळे कर्नाटकमधला हा राजकीय खेळ अजूनच रंगात आला आहे.

कुठे झाली सुरुवात?

सुमारे दीड वर्षापूर्वी कर्नाटकमध्ये भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले असूनही काँग्रेस आणि जदसेने आघाडी करत कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केले. मात्र, सरकार स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. याचा फायदा भाजपला झाला नसता तरच नवल! अखेर जुलै महिन्याच्या सुरुवातीला सत्ताधारी पक्षांमधल्या एकूण १७ आमदारांनी आत्तापर्यंत राजीनामे दिले आहेत. त्यामुळे काँग्रेस-जदसे सरकार अल्पमतात आलं आहे. ‘आम्ही आमच्या मनाने राजीनामे दिले असून विधानसभा अध्यक्षांनी ते स्वीकार करावेत’, अशी विनंती या आमदारांनी अध्यक्ष रमेश कुमार यांना केली. दरम्यान, सरकार अल्पमतात आल्यामुळे विरोधी पक्षात असलेल्या भाजपने आणि विरोधी पक्षनेते येडीयुरप्पा यांनी सत्ता स्थापनेसाठी दावा देखील केला. तसेच, कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचं आव्हान दिलं. दरम्यान, आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्षांनीच निर्णय घ्यावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांच्या याचिकेवर दिल्यामुळे तर या प्रकरणातला गोंधळ अधिकच वाढला.


हेही वाचा – कुमारस्वामींनी पत्करली हार; भाजपाला सत्तास्थापनेचे दिले निमंत्रण?

आणि येडियुरप्पांनी सभागृहातच दिला ठिय्या!

दरम्यान, रमेश कुमार यांनी विश्वासदर्शक ठरावाला संमती न दिल्यामुळे अखेर भाजपने थेट राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे धाव घेतली. वजुभाई वालांनी बहुमत सिद्ध करायला हवे असे मत व्यक्त केले. मात्र, त्याप्रमाणे गुरुवारी सकाळी सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडलाच नाही. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे निर्देश दिले. तेव्हा देखील हा ठराव सभागृहासमोर आला नाही. यावेळी येडियुरप्पांनी सभागृहातच धरणे आंदोलन करत ठराव येत नाही तोपर्यंत सभागृहातच ठिय्या मांडणार असल्याचं जाहीर केलं. अखेर शुक्रवारी दुपारी हा ठराव मांडला जावा असे आदेश राज्यपाल वजुभाई वाला यांनी दिले. मात्र, शुक्रवारी देखील दुपारी हा ठराव मांडला गेला नाही. शेवटी संध्याकाळी याच वातावरणात विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब केलं.

आता पुढचा अध्याय सोमवारी सकाळीच!

आता थेट सोमवारी सकाळी ११ वाजताच सभागृह सुरू होणार आहे. त्यावेळीच हा विश्वासदर्शक ठराव सभागृहासमोर येऊ शकणार आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याकडे सरकार वाचवण्याची तिसरी संधी जरी आली असली, तरी सभापती रमेश कुमार यांनी तिसऱ्यांदा राज्यपालांचा आदेश पाळला नाही. त्यामुळे या कानडी तमाशाचा शेवट कधी आणि कसा होणार? याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागलं आहे.