घरदेश-विदेशकोणतीही आपत्ती भारतीयांचा भविष्यकाळ निश्चित करू शकत नाही

कोणतीही आपत्ती भारतीयांचा भविष्यकाळ निश्चित करू शकत नाही

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास

कोणतीही आपत्ती १३० कोटी भारतीयांचा वर्तमान किंवा भविष्यकाळ निश्चित करू शकत नाही, असे ठामपणे सांगतानाच देशातील जनतेने आतापर्यंत धैर्य आणि संयमाचे दर्शन घडवले आहे. तसेच पुढेही जारी ठेवायचे आहे. करोनाविरुद्धची लढाई प्रदीर्घ आहे, मात्र आपण विजय पथावर वाटचाल करत आहोत आणि विजय प्राप्त करणे हा आपला सर्वांचा सामूहिक संकल्प आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

देशातील जनतेच्या नावे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या संदेशात त्यांनी करोनाच्या परिस्थितीवर भाष्य केले. तसेच केंद्र सरकारने जारी केलेले २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज आणि विविध योजनांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, एकीकडे अत्याधुनिक आरोग्यसेवा आणि विशाल अर्थव्यवस्था असलेल्या जगातील मोठ्या मोठ्या महासत्ता आहेत तर दुसरीकडे इतकी प्रचंड लोकसंख्या आणि अनेक आव्हानांनी ग्रासलेला आपला भारत देश आहे. पुष्कळ लोकांनी शंका व्यक्त केली होती की जेव्हा करोनाचा भारतावर हल्ला होईल तेव्हा भारत पूर्ण जगासाठी संकट ठरू शकतो.

- Advertisement -

आज सर्व देशवासीयांनी भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला आहे. तुम्ही हे सिद्ध केले आहे की जगातील सामर्थ्यवान आणि संपन्न देशांच्या तुलनेत भारतीयांचे सामूहिक सामर्थ्य आणि क्षमता अभूतपूर्व आहे. टाळ्या-थाळ्या वाजवून आणि दिवे प्रज्वलित करून तसेच सेनेकडून करोना योद्ध्यांचा सन्मान असेल, जनता कर्फ्यू असेल किंवा देशव्यापी टाळेबंदी दरम्यान नियमांचे निष्ठेने पालन असेल, या सर्व प्रसंगी तुम्ही दाखवून दिले आहे की एक भारत हीच श्रेष्ठ भारताची हमी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

निश्चितच इतक्या मोठ्या संकटात असा दावा कोणी करणार नाही की कोणालाच काही त्रास किंवा गैरसोय झाली नाही. आमचे श्रमिक मित्र, प्रवासी कामगार बंधू-भगिनी, छोट्या-छोट्या उद्योगात काम करणारे कारागीर, स्थानकांवर सामान विकणारे, टपरी-हातगाडी लावणारे, दुकानदार, लघु उद्योजक अशा सहकार्‍यांनी अपरिमित यातना सोसल्या आहेत. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करीत आहोत. देशासमोर अनेक आव्हाने आहेत, समस्या आहेत. मी अखंड प्रयत्न करत आहे. माझ्यात काही उणीव असू शकते, मात्र देशात काही उणीव नाही. म्हणूनच माझा तुमच्यावर स्वतः पेक्षा जास्त विश्वास आहे, तुमची शक्ती, तुमच्या सामर्थ्यावर आहे, असेही मोदी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -