Nobel Prize 2020 : रसायनशास्त्रातील पुरस्कार शार्पेंची, डाउडना यांना जाहीर

यंदाचा रसायनशास्त्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार इमॅन्यूअल शार्पेंची आणि जेनफिर डाउडना यांना जाहीर झाला आहे. जीनोमवरील संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. इमॅन्यूअल शार्पेंची आणि जेनफिर डाउडना यांनी जीनोमच्या संपादनात महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यामुळे त्यांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात येणार असल्याचे पुरस्कार समितीने म्हटले आहे.

स्टॉकहोममध्ये ‘स्वीडिश अॅकडमी ऑफ सायन्स’च्या पॅनलने आज, बुधवारी पुरस्कार विजेत्या शास्त्रांच्या नावाची घोषणा केली. मागील वर्षी लिथियम-आयन बॅटरी विकसित करणारे शास्त्रज्ञ जॉन बी गुडइनफ, एम. स्टॅनली विटिंघम आणि अकिरा योशिनो यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांना एक सुवर्ण पदक, एक कोटी स्वीडिश क्रोना म्हणजेच ८ कोटी रुपये दिले जातात.

जगभरात प्रतिष्ठित मानला जाणारा नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिले जातात. दरवर्षी त्यांच्या स्मृतीदिनी, १० डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान सोहळा होतो. वैद्यकशास्त्रासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

हेही वाचा –

H1B Visa : अमेरिकेचा मोठा निर्णय; भारतीयांना मोठा फटका!