‘भारतालाही एका बायडेनची गरज, २०२४ मध्ये असा नेता मिळेल अशी आशा’

जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. बायडेन विजयी झाल्यानंतर जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्रध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत अमेरिकन नागरिकांचे अभिनंदन करत एक आशा व्यक्त केली आहे.

दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत अमेरिकन नागरिकांचं अभिनंदन केले आहे. “सर्व अमेरिकन मतदारांचे ज्यांनी बायडन यांची निवड केली त्याबद्दल अभिनंदन. बायडेन अमेरिकन लोकांना एकजुट करतील आणि आधीच्या अध्यक्षांप्रमाणे फूट पाडणार नाहीत,” असं दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. अजून एक ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भारताला देखील एका बायडेनची गरज आहे, असे म्हटले आहे.

“आता भारतालाही एका बायडेनची गरज आहे. आशा करूया की आपल्याला २०२४ मध्ये असा नेता मिळेल. राजकीय पक्षांशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक भारतीयाने यासाठी प्रयत्न करायला हवेत. भारतातही फुट पाडणाऱ्या शक्तींना हरवावे लागेल. आपण सर्वप्रथम भारतीय आहोत,” असे दिग्विजय सिंह म्हणाले.

दरम्यान, संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा शनिवारी निकाल लागला. गेले चार दिवसांपासून मतमोजणी सुरु होती. अखेर बायडेन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांना पराभूत केले. बायडेन यांना २७३, तर ट्रम्प यांना २१४ मते पडली. बायडेन यांना ५०.५ टक्के म्हणजे ७ कोटी ४४ लाख ७८ हजार ३४५ मते, तर ट्रम्प यांना ४७.७ टक्के म्हणजे ७ कोटी ०३ लाख २९ हजार ९७० मते मिळाली आहेत. पेनसिल्वेनियात अखेर बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले.