बराक ओबामांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकात राहुल गांधींचा उल्लेख; म्हणाले…

राहुल गांधी हे ‘नर्व्हस’ आणि कमी योग्यतेचे नेते असल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उल्लेख करत त्यांच्याबद्दल मोठी बाब नमूद केली आहे. ओबामा यांनी आपले पुस्तक ‘अ प्रॉमिस्ड लँड’ मध्ये राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. “राहुल गांधी हे एक विद्यार्थी आहेत ज्याने अभ्यासक्रम पूर्ण तर केला आहे आणि ते शिक्षकांना प्रभावित करण्यास उत्सुक आहेत. परंतु त्या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी त्यांच्याकडे योग्यता नाही किंवा त्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी त्यांच्यात ती आग नाही,” असे ओबामा यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

यासह राहुल गांधी हे ‘नर्व्हस’ आणि कमी योग्यतेचे नेते असल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त ओबामा यांनी आपल्या पुस्तकात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने ओबामाच्या ‘ए प्रॉमिसिड लँड’ या आत्मचरित्राचा आढावा घेतला आहे. यामध्ये बराक ओबामा यांनी जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही भाष्य केले आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाच्या आढाव्यानुसार ओबामा राहुल गांधींबद्दल म्हणतात की, “राहुल गांधी यांच्यात एका घाबरलेल्या विद्यार्थ्याचे गुण आहे. ज्या विद्यार्थ्याने आपला संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि त्याला आपल्या शिक्षकाला प्रभावित करायचे आहे. परंतु त्याच्याकडे त्या विषयात प्राविण्य मिळवण्याची योग्यता नाही किंवा त्याच्याकडे प्राविण्य मिळवण्यासाठी उत्कटता नाही.”

मनमोहन सिंग यांची स्तुती

“भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री बॉब गेट्स यांच्यात एक खरेपणा आणि प्रामाणिकपणा आहे,” असेही ओबामा यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्षा व्लादिमीर पुतिन हे मशीन चालवणारे मजबूत आणि धुर्त बॉस असल्याचंही त्यांनी म्हटले. ओबामा यांचे हे पुस्तक १७ नोव्हेंबर रोजी बाजारात उपलब्ध होणार आहे. बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात २०१० आणि २०१५ मध्ये भारताचा दौरा केला होता.


‘मी मुख्यमंत्री पदावर दावा केलाच नाही’, नितीश कुमार यांच्या दाव्याने खळबळ