भारतातल्या या गावात एक व्यक्ती सोडून सगळे झाले कोरोना पॉझिटिव्ह!

thorang village

हिमाचल प्रदेशच्या लाहौल जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढू लागला असून आत्तापर्यंत या जिल्ह्यात ८५६ कोरोना बाधित सापडले आहेत. त्यामध्ये थोरांग गावातल्य ४१ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. या गावाची एकूण लोकसंख्या आहे ४२. पण त्यातला फक्त एक गावकरी कोरोना निगेटिव्ह आला असून उर्वरीत सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. या प्रकारामुळे गावकऱ्यांसोबतच आरोग्य प्रशासनातील अधिकारी देखील हैराण झाले आहेत. मात्र, त्यासोबतच आरोग्य प्रशासनाला यातून धोक्याची घंटा दिसू लागली असून त्या दृष्टीने जिल्ह्यात कोरोनाविषयी जनजागृती करायला सुरुवात करण्यात आली आहे.

थोरांग गावात ५२ वर्षीय भूषण ठाकूर यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. कारण गावातल्या एकूणएक व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. काही दिवसांपूर्वी गावात झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमातूनच ही कोरोनाची बाधा सगळ्यांना झाली असावी, असा अंदाज आरोग्य प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यासोबतच या प्रकारामुळे आसपासच्या गावांमध्ये देखील कोरोनाचा फैलाव झाला असावा, असा देखील संशय प्रशासनाला येत आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये आत्तापर्यंत ३२ हजार १९८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ६ हजार ९८० रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून ४८१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.