इव्हीएमविरोधात विरोधीपक्ष सुप्रीम कोर्टात जाणार

पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर पुन्हा दिसली खोट

Delhi
EVM

लोकसभेसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्याबरोबर काँग्रेससह विरोधकांना इव्हीएम मशिनमध्ये पुन्हा खोट दिसू लागली आहे. यावेळी इव्हीएम मशिनच्याविरोधात विरोकांनी चक्क सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. इव्हीएमसोबत लावलेल्या व्हीव्हीपॅट मशिनमधील रिअ‍ॅक्शन टाइम आणि त्यातून निघणारी पावती चुकीच्या नावाने येत असल्याचा विरोधकांचा दावा आहे.

सेव्ह डेमोक्रसी (लोकशाही बचाव) या नावाने काँग्रेस नेते अभिषेक मनू संघवी, कपिल सिब्बल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी नवी दिल्लीत रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. इव्हीएममध्ये मतदान केल्यानंतर त्याच्यासोबत व्हीव्हीपॅटमधून आलेली पावती केवळ तीन सेकंद दिसली. हा वेळ खूप कमी असून तो ७ सेकंद करण्यात यावा, अशी मागणी अभिषेक मनू संघवी यांनी केली आहे.

मतदान केलेल्या पक्षाऐवजी व्हीव्हीपॅटमधून भलत्याच पक्षाच्या नावाची चिठ्ठी आल्याची मतदारांनी तक्रार केली आहे. याचा अर्थ इव्हीएममध्ये फेरफार करण्यात आला आहे, असा दावा संघवी यांनी केला. व्हीव्हीपॅटमधून निघणार्‍या पावत्यांच्या मोजणीसाठी ५ दिवस लागणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आम्ही निवडणूक आयोगाला त्यांची टीम वाढवायला सांगितली आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅटच्या पावत्या मोजण्यासाठी ५ दिवस लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी इव्हीएम मशिनमध्ये फेरफार करण्यात येऊ शकते, असा आरोप केला. आमच्याकडे १२ तासांसाठी इव्हीएम मशिन द्या, आम्ही फेरफार करून दाखवू. त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, असेही ते म्हणाले.

भाजपला मतदान होणार -केजरीवाल

इव्हीएम मशिनमध्ये फेरफार करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ भाजपलाच मतदान जाईल, अशा पद्धतीनेच ही मशीन तयार करण्यात आली असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. ज्या मशीनमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला जात आहे, त्या त्या मशीनमधील मते केवळ भाजपलाच का जातात? मी स्वत: इंजिनिअर आहे. त्यामुळे मला बर्‍यापैकी कळते. भाजपवाले स्वत:ला मर्दही समजतात आणि चोरीही करतात, अशी टीका केजरीवाल यांनी केली.

चंद्राबाबूंचा एक्सपर्ट निघाला एव्हीएम चोर

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत शनिवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. एका इव्हीएम एक्सपर्ट हवाल्याने चंद्राबाबू नायडूंनी हा दावा केला होता. मात्र निवडणूक आयोगाने जेव्हा त्या एक्सपर्ट या दाव्याबाबत अधिक माहिती आणण्यास सांगितले तेव्हा हा एक्सपर्ट दुसरा तिसरा कुणी नाही तर हैदराबाद येथील रहिवासी हरिप्रसाद असल्याचे समोर आले. तसेच 2010 मध्ये इव्हीएम चोरीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here