पाकिस्तानच्या कुरघोडींवर भारतीय लष्कराने दिलं चोख प्रत्युत्तर

POK मध्ये मोठं नुकसान झाल्याची नेत्यांची कबुली

प्रातिनिधीक फोटो

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून या चकमकीत तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत, तर तीन जवान जखमी झाले आहेत. याशिवाय तीन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. गुरेज ते उरी सेक्टरदरम्यान हा गोळीबार शुक्रवारी करण्यात आला होता. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या गुरेझ ते उरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचा शुक्रवारी पुन्हा भंग केल्याने पाकच्या या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

यावेळी पाकिस्तानचे ११ सैनिक ठार झाले. तसेच पाकिस्तानी लष्कराचे तंबू, खंदक आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाल्याचा व्हिडिओ भारतीय लष्कराने प्रसारित केला आहे. दरम्यान, भारतीय लष्कराच्या माऱ्यासमोर पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांनाी धूम ठोकली. दरम्यान, पाकिस्तानकडून हे लपवण्याचा प्रयत्न होत असला तरी पाकव्याप्त काश्मीरच्या काही नेत्यांनी भारतीय लष्करानं दिलेल्या प्रत्युत्तरात नीलम आणि लीपा क्षेत्रात आतापर्यंतचं सर्वात मोठं नुकसान झाल्याची कबुली दिली आहे.

पाकव्याप्त काश्मीरचे सिव्हिल डिफेन्स आणि आपात्कालिन व्यवस्था प्रकरणांचे सेक्रेटरी सय्यद शाहिद मोहयिद्दीन कादरी यांनी भारतीय लष्करानं दिलेल्या प्रत्युत्तरात नीलम, लीपा आणि मुजफ्फराबाद क्षेत्रातील नौसेरा सेक्टरमध्ये मोठं नुकसान झाल्याची कबुली दिल्याचे वृत्त पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने दिले. तर नीलम खोऱ्यात भारताकडून आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रत्युत्तर देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी गेल्यावर्षीही पाकिस्तानच्या कुरापतींनंतर भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळतेय.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर निशाणा

नीलम खोऱ्याचे उपायुक्त राजा महमूद शाहित यांनी भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरात ४ जणांचा मृत्यू आणि २५ जण जखमी झाल्याचे सांगितले. तसेच यामध्ये कमीतकमी १५ घरे उद्ध्वस्त झाल्याचेही सांगण्यात आले. भारताच्या प्रत्युत्तराने बिथरलेल्या पाकव्याप्त काश्मीरचे कथित पंतप्रधान राजा फारूख हैदर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला. नियंत्रण रेषेवरील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोण जबाबदार आहे आणि अशाप्रकारे मोठ्या नुकसानीचा आम्हाला कधीपर्यंत सामना करावा लागणार आहे हे इम्रान खान यांनी स्पष्ट करावे, असे त्यांनी सांगितले.


पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन तीन जवान, तीन भारतीयांचा मृत्यू