आता पाकिस्तान बासमती तांदुळासाठी भारताशी भांडणार!

pakistan oppose india claim gi tag for basmati

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही सीमेवर पाकिस्तानची आगळीक काही थांबलेली नाही. सीमाभागात पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याच्या घटना घडल्याचं दिसून आलं आहे. त्यासोबतच, आंतरराष्ट्रीय समुदायासमोर देखील पाकिस्तानकडून भारतविरोधी भूमिका घेतली गेली आहे. त्यातच आता आणखी एका वादाची भर पडली आहे. आता पाकिस्तान भारतासोबत बासमती तांदुळाच्या मुद्द्यावरून भांडणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. त्यामुळे दहशतवादी कारवाया, सीमाभागातली घुसखोरी, शस्त्रसंधीचं उल्लंघन, काश्मीर मुद्द्यावरून सातत्याने हेकेखोर आणि आक्रमक भूमिका यात आता भारतविरोधी एका नव्या वादाची भर द्विपक्षीय संबंधांमध्ये पडली आहे. भारतानं केलेल्या जिओग्राफीकल आयडेंटिफिकेशन टॅगच्या दाव्याला पाकिस्ताननं विरोध केला आहे.

‘बासमती’वरून काय आहे पाकिस्तानचं भांडण?

भारतानं नुकताच बासमती तांदुळासाठी युरोपियन युनियनमध्ये जिओग्राफीकल आयडेंटिफिकेशन टॅग अर्थात GI साठी दावा केला आहे. मात्र, या दाव्याला पाकिस्ताननं तीव्र विरोध केला आहे. जियो न्यजच्या हवाल्यानं लाईव्ह हिंदुस्ताननं दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान हा बासमती तांदुळाचा मोठा उत्पादक देश आहे. त्यामुळे बासमतीचे विशेष उत्पादक असल्याचा टॅग मिळवण्यासाठी भारतानं केलेला दावा चुकीचा आहे. यासंदर्भात इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन ऑफ पाकिस्तान (IPO) आणि REAP या संघटनांनी भारताच्या दाव्याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळेच भारताच्या दाव्याला पाकिस्तान युरोपियन युनियनमध्ये विरोध करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

गंगा आणि हिमालयाच्या मैदानी प्रदेशामध्ये…

बासमती तांदुळाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. या भागात उत्पादित होणारा बासमती तांदुळ त्याच्या सुगंधामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. त्यासोबत भारतात देखील हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बासमती तांदुळाचं उत्पादन घेतलं जातं. नुकताच यासंदर्भात मध्य प्रदेशने जीआय टॅगसाठी दावा केला होता. मात्र, त्याला पंजाब आणि इतर राज्यांनी विरोध केला होता. दरवर्षी भारत जवळपास ३३ हजार कोटी रुपयांचा बासमती तांदुळ निर्यात करतो.

जिओ टॅग काय प्रकार आहे?

एखाद्या भागामध्ये एखाद्या विशिष्ट गोष्टीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असेल, तर त्या भागाला संबंधित वस्तूच्या उत्पादनाचा जिओ टॅग देण्यात येतो. याला Geographical Indication Tag असं म्हणतात. कांजीवरमच्या साड्या, दार्जिलिंगचा चहा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, जयपूरची नक्षीदार चीनी मातीची भांडी, बनारसी साडी, तिरूपतीचे लाडू अशा अनेक गोष्टींचे मिळून सुमारे ६०० जिओ टॅग भारतीय उत्पादनांना मिळाले आहेत.