पाकिस्तानच्या शाळेतील मुलं म्हणतात ‘जय श्रीराम’

पाकिस्तानातील एका हिंदू मंदिरात मुस्लीम शिक्षिकेच्या अभिवादनाला 'जय श्रीराम' असं अभिवादन करण्यात येतं. हिंदू संस्कृती या शाळेत जपली जात आहे.

Mumbai
pakistan karachi school
पाकिस्तानातील कराचीमधील शाळा

पाकिस्तानमध्ये अशी एक शाळा आहे, जिथे अस्सालाम अलैकुम म्हटल्यानंतर मुलांचं अभिवादन ‘जय श्रीराम’ असं अशा आवाजात येतं. हे वाचून आश्चर्य वाटलं ना? पण पाकिस्तामधील एका हिंदू मंदिरामध्ये असलेल्या शाळेमधील मुलांच्या दिवसाची सुरुवात अशाच तऱ्हेनं होते. अनम आगा असं या शाळेतील शिक्षिकेचं नाव असून तिनं केलेल्या अभिवादनाला मुलांच्या एकसुरात ‘जय श्रीराम’ असं आनंदानं म्हटलं जातं. गेल्या वर्षी या शाळेमध्ये शिकवायला आलेल्या अनमला अजिबात कल्पनाही नव्हती की, ती या मंदिरातील शाळेत रोज शिकवू शकेल. पण गेले एक वर्ष ती एका अल्पसंख्यांक समुदायाच्या मंदिरात या मुलांना शिकवण्यासाठी जात आहे. कराचीमधील रहमान कॉलनीतल्या या हिंदू मंदिरात शिकवण्याचा प्रस्ताव तिला मार्च २०१७ मध्ये मिळला. त्यानंतर या प्रस्तावाचा स्वीकार करत आपल्यासाठी मुस्लीम असूनही हिंदू मंदिरात शिकवण्यासाठी विचारल्यामुळं सन्मानाची गोष्ट असल्याची भावना अनमनं व्यक्त केली आहे. या समुदायाच्या हिंदू मुलांना ही शिक्षिका गेले एक वर्ष शिकवत आहे.

एकत्र साजरे होतात सण

या मंदिरामध्ये शाळेची स्थापना ‘इनिशिएटर ह्यूमन डेव्हलपमेंट फाऊंडेशन’ (आयएचडीएफ) ने केली असून गरीब मुलांना शिकवण्याचं काम इथे करण्यात येतं. या शाळेत हिंदू विद्यार्थी आणि मुस्लीम शिक्षिकेनं एकत्र होळी, रक्षाबंधन, दिवाळी आणि इतर सणही साजरे केले. आपण एकमेकांचा सम्मान करत नाही, तोपर्यंत धार्मिक भेदभाव दूर होणार नाहीत, असं मत अनमनं व्यक्त केलं आहे. त्यामुळंच या शाळेत अतिशय गुण्यागोविंदानं हिंदू आणि मुस्लीम नांदत आहेत. दरम्यान मंदिरातील सेवक रूपचंदच्या म्हणण्यानुसार, हिंदू मंदिर हे मानवतावाद पाळत असल्यामुळंच इथे कोणताच भेदभाव नसल्याचं म्हटलं आहे. ही शाळा सुरु करण्यासाठी सुरुवातीला खूपच त्रास झाला होता, मात्र आता यश मिळालं असल्याचंही म्हटलं आहे. हिंदू समुदायाजवळ शाळा उघडण्यासाठी कोणतीही जागा न मिळाल्यामुळं मंदिरातच शाळा उघडण्यात आल्याचं सांगण्यात आलं.