‘सरकार’मुळं तामिळनाडू चित्रपटसृष्टी ढवळतेय

सरकार चित्रपटावरून सध्या तामिळनाडूमध्ये वाद सुरू आहे. सत्ताधारी AIADMKच्या नेत्यांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला आहे.

chennai
sarkar-protest-696x422

सरकार चित्रपटावरून तामिळनाडूमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय, सत्ताधारी AIADMKच्या नेत्यांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला आहे. DMKचे कलानिधी मारन हे सरकार चित्रपटाचे निर्माते आहेत. दरम्यान, सरकार चित्रपटामध्ये असलेली काही दुश्य आणि संवाद हे AIADMKच्या विरोधात असल्याचं पक्षाच्या नेत्यांना वाटतंय. परिणामी चित्रपट रिलीज झाल्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी, आमदारांनी चित्रपटगृहाबाहेर आंदोलनं केली आणि विरोधात प्रदर्शनं देखील केली आहेत. ए.आर.मुरुगादॉस हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यांना अटक करण्यासाठी रात्री पोलिसांनी हालचाल सुरू केल्याचं ट्विट सन टीव्ही पिक्चर्सने केलं होतं. त्यामुळे प्रकरण आणखीन चिघळून वातावरणातील तणाव वाढला.

६ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या सरकार या चित्रपटामध्ये अभिनेता विजयची मुख्य भूमिका आहे. २ दिवसामध्ये या चित्रपटाने तब्बल १०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर हा चित्रपट वादात सापडला होता. त्यावेळी तमिळनाडूमधील मंत्री कादंबूर राजू यांनी वादग्रस्त सीन हटवण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, कादंबूर राजू यांच्या इशाऱ्यानंतर देखील मुरुगादॉसच्या घरी पोलिसांचं येणं हा योगायोग नसल्याचं स्थानिक जाणकारांचं म्हणणं आहे.

सरकार या चित्रपटामध्ये खलनायिका दाखवण्यात आली आहे. महिला मुख्यमंत्र्यांचं हे पात्र जयललिता यांच्यावर आधारित असल्याचा दावा AIADMKनं केला आहे. तसेच या पात्राच्या तोंडी असलेले संवाद देखील आक्षेपार्ह असल्याचं  AIADMKच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

मीडियानं यासंदर्भात पोलिसांना विचारले असता त्यांनी, मुरुगादॉस यांनी केलेल्या आरोपांचा इन्कार केला. चित्रपटामुळे निर्माण झालेल्या वादामुळे त्यांच्याघराबाहेर पोलिस सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी गेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सरकार चित्रपटामुळे तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये दोन गटांमध्ये असलेल्या दरीत वाढ होण्याची शक्यता आहे. हिरो विजय आणि दिग्दर्शक मुरुगादॉस यांना कमल हसन सारख्या अभिनेत्यांनी देखील पाठिंबा दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here