‘ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करता’, जया बच्चन यांनी रवी किशन यांच्यावर केली टीका

parliament monsoon session samajwadi party mp jaya bachchan bjp mp ravi kishan
'ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करता', जया बच्चन यांनी रवी किशन यांच्यावर केली टीका

बॉलिवूडला ड्रग्जमुळे बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे वक्तव्य आज राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी केले. तसेच त्यांनी भाजपचे खासदार रवी किशन यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. जया बच्चन म्हणाल्या की, ‘काल लोकसभेत एका खासदाराने बॉलिवूडविषयी निवेदन दिले. ते पण बॉलिवूड इंडस्ट्रीमधूनच आहेत. हे लाजिरवाणे आहे. ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करता. हे चुकीचे आहे’, असे म्हणत रवी किशन यांच्यावर टीका केली आहे.

भोजपुरी सुपरस्टार आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार रवी किशन यांनी सोमवारी लोकसभेत बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांकडून ड्रग्ज सेवनाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याविषयी चौकशीची मागणी केली होती. यावरूनच जया बच्चन यांनी आज राज्यसभेत अप्रत्यक्षपणे रवि किशन यांच्यावर टीका केली आहे.

ड्रग्ज प्रकरणात अनेक बॉलिवूडमधील स्टार्सची नावे समोर आली आहेत. याबाबत जया बच्चन म्हणाल्या की, ‘बॉलिवूडला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्री दररोज ५ लाख लोकांना रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती चांगली नसून काही गोष्टींकडून लक्ष हटवण्यासाठी आमचा वापर केला जात आहे. सोशल मीडियावर आमच्याबद्दल वाटेल ते बोलले जात आहे. आम्हाला सरकारकडून देखील समर्थन मिळत नाही आहे. ज्यांनी या इंडस्ट्रीच्या मदतीने नाव कमावले आहे तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणत आहे. याला माझा पूर्णपणे विरोध आहे. लोकांशी अशा प्रकारची भाषा वापरू नये, असे सरकारडून सांगण्यात यावे, अशी माझी आशा आहे.’


हेही वाचा – आज संसदेत राजनाथ सिंह LAC वरील परिस्थिती संदर्भात बोलणार