संसदेत पॉर्न पाहाताना पकडला गेला खासदार; अध्यक्ष म्हणतात, ती वैयक्तिक बाब!

clip
प्रातिनिधिक छायाचित्र

देशाची संसद म्हणजे राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं ठिकाण. मात्र, अशाच ठिकाणी काही आक्षेपार्ह गोष्टी जेव्हा घडतात, तेव्हा त्याची चर्चा तर होणारच. काही वर्षांपूर्वी कर्नाटकच्या विधानसभेमध्ये एका आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप पाहाताना रंगेहाथ कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं होतं. आता तसाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एका देशाच्या संसदेमध्ये एक खासदार चक्क अश्लील फोटो बघताना आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा हे प्रकरण संसदेच्या अध्यक्षांसमोर गेलं, तेव्हा खासदारांनी काय पाहावं, काय पाहू नये, हा त्यांचा वैयक्तिक मामला आहे, असं म्हणून अध्यक्षांनी चक्क या खासदाराला अभय दिलं आहे! त्यामुळे हा प्रकार सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर या खासदारानं दिलेलं उत्तर तर या सगळ्या प्रकाराहून भयंकर होतं!

हा सगळा प्रकार घडलाय थायलंडमध्ये!

थायलंडच्या संसदेमध्ये सध्या तिथल्या वार्षिक अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. यावेळी चर्चेमध्ये बसलेले खासदार रोन्नाथेप अनुवत यादरम्यान मोबाईलमध्ये गुंतले होते. विशेष म्हणजे अनुवत सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. जेव्हा पत्रकारांना हा प्रकार दिसला, तेव्हा त्यांनी हे दृष्य मोबाईलमध्ये चित्रीत करण्याचा प्रयत्न केला. पण झूम केल्यानंतर रोन्नाथेप अनुवत काय बघत होते याचा साक्षात्कार पत्रकारांना झाला. आपल्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो बघणाऱ्या अनुवत यांची दृश्य पत्रकारांनी ताबडतोब मोबाईलमध्ये कैद केली.

हा प्रकार जेव्हा तक्रारीदाखल थायलंडच्या संसदेचे अध्यक्ष चुआन लिक्पई यांच्यासमोर गेला, तेव्हा त्यांनी अजबच तर्कट मांडलं. संसदेमध्ये आपल्या मोबाईलवर कुणी काय पाहावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मामला आहे. त्यासंदर्भात कोणताही नियम अस्तित्वात नाही, असं लिक्पई म्हणाले. त्यामुळे या खासदारांवर कारवाई होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं तिथल्या स्थानिक माध्यमांचं म्हणणं आहे.

…म्हणून फोटो झूम करून बघत होतो!

मात्र, दुसरीकडे खासदार रोन्नाथेप अनुवत यांनी तर अध्यक्षांपेक्षाही मोठी गुगली टाकत बाजू सावरायचा प्रयत्न केला. जेव्हा अनुवत यांना पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली, तेव्हा ते म्हणाले, ‘मला कुणीतरी फोटो पाठवले होते. पाठवणाऱ्याने मदतीची मागणी केली होती. म्हणून मी ते फोटो बघत होतो. फोटोमधील तरुणीच्या मागे काय आहे ते पाहण्यासाठी मी फोटो झूम करून पाहात होतो. जेणेकरून तिच्या पाठी कुणी उभं आहे का किंवा तिच्यावर दबाव टाकून कुणी फोटो काढायला लावत नाही ना हे कळू शकेल’!

या सगळ्या प्रकाराचा निकाल काय लागेल, हे अद्याप कळू शकलेलं नसलं, तरी रोन्नाथेप अनुवत यांचं अजबे स्पष्टीकरण मात्र भलतंच चर्चेत आलं आहे.