घरदेश-विदेश‘खतना’ प्रथेवर सर्वोच्च न्यायालय कडाडले, सुनावणीत विचारला जाब!

‘खतना’ प्रथेवर सर्वोच्च न्यायालय कडाडले, सुनावणीत विचारला जाब!

Subscribe

मुस्लिम समाजातल्या दाऊदी बोहरा समाजातील महिलांवरील अन्यायकारक अशा 'खतना' प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये टिप्पणी केली आहे. अशा प्रकारे कुणाच्याही गुप्तांगाला तुम्ही कसे हात लावू शकता? असा सवालच न्यायालयाने विचारला आहे. या प्रथेविरोधात दिल्लीस्थित वकिलाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ जुलै रोजी होणार आहे.

विकासाच्या कितीही बाता मारल्या, तरी देशात आजही अशा अनेक कुप्रथा अस्तित्वात आहेत की ज्यामुळे समाजात माणुसकीच अस्तित्वात आहे का? असा प्रश्न नक्कीच सामाजिक कार्यकर्त्यांना पडतो. मग ती देवदासी प्रथा असो किंवा मग काही समाजांमध्ये लग्नाआधी मुलीची केली जाणारी कौमार्य चाचणी असो. अशीच एक धक्कादायक प्रथा मुस्लिम समाजातल्या दाऊदी बोहरा समाजात आहे. ज्यामध्ये लहान मुलींची खतना केली जाते. यामध्ये मुलीच्या गुप्तांगातील क्लिटोरिस हा भाग कापला जातो. गेल्या अनेक शतकांपासून या समाजामध्ये ही धक्कादायक आणि मुलींवर अन्याय करणारी कुप्रथा पाळली जात आहे. मात्र, आता या प्रथेविरोधात आवाज उठवला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रथेविरोधात एक याचिका दाखल झाली असून सर्वोच्च न्यायालयाने या प्रथेवर कठोर शब्दांत टिप्पणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ जुलैला होणार आहे.

कुणाच्याही गुप्तांगाला कसे हात लावू शकता?

या कुप्रथेविरोधात कठोर शब्दांत टिप्पणी करताना ‘तुम्ही कुणाच्याही गुप्तांगाला कसे हात लावू शकता?’ असा परखड सवालच सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी सुरू आहे. ‘कोणत्याही महिलेचं कौमार्य तिच्या परवानगीशिवाय कुणीही भंग करू शकत नाही’, असंही सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं आहे.

- Advertisement -

दिल्लीतील वकिलाची याचिका

सुनिता तिवारी या दिल्लीतील महिला वकिलाने ही याचिका दाखल केली आहे. देशभरात खतना अर्थात Female Genital Mutilation(FGM) या कुप्रथेवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी अशा मागणी या याचिकेद्वारे सुनिता तिवारी यांनी केली आहे. या प्रथेला कुराणमध्येही कोणताही आधार नसल्याचंही याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. अशा प्रकारे खतना करणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

पोक्सो कायद्याचं उल्लंघन

दरम्यान, खतनाची प्रथा पाळणं हे पोक्सो अर्थात बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्याचंही उल्लंघन असल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात आला आहे. ‘खतना केल्यामुळे त्या मुलीवर आयुष्यभर होणारे शारिरीक दुष्परिणाम आणि मानसिक तणाव याचाही अहवाल आम्ही तयार केला आहे’ अशी माहिती यावळी याचिकाकर्तीच्या वकील इंदिरा जयसिंग यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

- Advertisement -

काय आहे खतना?

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये अस्तित्व असलेल्या दाऊदी बोहरा समाजामध्ये ही प्रथा पाळली जाते. यामध्ये मुलगी लहान असतानाच तिच्या गुप्तांगातील क्लिटोरिस हा भाग कापला जातो. अनेक ठिकाणी या भागाला ‘हराम की बोटी’ असंही म्हटलं जातं. खतना केल्यामुळे ‘महिला वाईट मार्गाला लागणार नाही’, अशी धारणा या समाजामध्ये आहे. असं झाल्यास समाजासाठी ती मानहानीची बाब असेल, असंही या समाजात मानलं जातं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -