CoronaVirus : करोनामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात वाढला दुरावा!

देशातील करोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमुळे केंद्रीय मंत्रिमंडळात दुरावा निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे.

New Delhi
Prime Minister narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी देशातील करोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. देशभरात संचारबंदी लागू झाल्यामुळे करोनाचं गांभीर्य देशभरातल्या नागरिकांपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे आता सर्वच नागरिक करोनाच्या भितीच्या छायेत आपली काळजी घेताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर लोकांनी घाबरून जाऊन किराणा माल, भाजीपाला आणि दुग्धजन्य पदार्थ्यांच्या खरेदीसाठी दुकानांसमोर मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. या वातावरणात करोनाचा फैलाव अजून वाढण्याचा धोका निर्माण झाला. अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात परिपत्रक काढून या जीवनावश्यक गोष्टी लॉकडाऊनमध्ये देखील सुरूच राहणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या तिघांनी देखील जनतेला या सर्व गोष्टी सुरू राहणार असून त्यासाठी दुकानांसमोर गर्दी करू नका असं आश्वासन दिलं. मात्र, मोदींच्या घोषणेनंतर समोर आलेल्या एका छायाचित्रातून करोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळातच दुरावा निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे.

करोनाच्या विषाणूमुळे मंत्रिमंडळात दुरावा!

करोनापासून कसा बचाव करावा? यासंदर्भात अनेक मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देखील जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाच्या ठरणाऱ्या बाबी म्हणजे प्रत्येकानं घरीच राहावं, अत्यावश्यक गोष्टींसाठीच घराच्या बाहेर पडावं आणि बाहेर गेल्यानंतर कुणालाही भेटताना मध्ये किमान एक मीटरचं अंतर ठेवावं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे करोनाचा विषाणू शिंक किंवा खोकल्यावाटे बाहेर पडल्यानंतर फक्त तीन फुटांपर्यंतच हवेत राहू शकतो. त्यानंतर तो खाली पडतो. मात्र, यामुळेच आता मंत्रिमंडळातला दुरावा वाढला आहे.

बैठकीच्या खोलीत अस्ताव्यस्त खुर्च्या?

मोदींच्या घोषणेनंतर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचं एक छायाचित्र सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. एरवी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक समोरासमोर मांडलेले टेबल आणि शेजारी-शेजारी ठेवलेल्या खुर्च्या अशा पद्धतीने पार पडते. आज मात्र या बैठकीचं चित्र वेगळं होतं. या छायाचित्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात पुढे केंद्रस्थानी बसलेले दिसत आहेत. खोलीमध्ये कोणतंही टेबल दिसत नाहीये. सगळे मंत्री खुर्च्यांवर बसले आहेत. पण या खुर्च्या सुरुवातीला पाहात अस्ताव्यस्त दिसत आहेत. पण नीट पाहिलं, तर त्या एकमेकांपासून किमान एक मीटर अंतरावर पद्धतशीरपणे मांडण्यात आलेल्या आहेत. सर्व मंत्री देखील त्यावर शिस्तीचं पालन करत बसलेले दिसत आहेत. कदाचित या छायाचित्रातून केंद्र सरकारला जनतेला हाच संदेश द्यायचा असेल, की करोनाला मात देण्यासाठी अशा पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आवश्यक आहे!

pm modi meeting


CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये काय सुरू काय बंद? गोंधळ उडालाय? इथे वाचा!