घरताज्या घडामोडीPM Modi Leh Visit : मोदींनी जवानांशी साधला संवाद, थेट चीनला दिला...

PM Modi Leh Visit : मोदींनी जवानांशी साधला संवाद, थेट चीनला दिला इशारा!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अचानक लेह, लडाख भेटीवर गेल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या भेटीमध्ये त्यांनी तिथे तैनात असलेल्या भारतीय जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जवानांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी जवानांशी संवाद साधला.

‘ही जमीन वीरांची आहे. याच्या रक्षणासाठी आपलं समर्थन आणि सामर्थ्य आहे. आपला संकल्प हिमालयाइतका उंच आहे. तो संकल्प मला यावेळी तुमच्या डोळ्यांमध्ये दिसतोय. तुमच्या चेहऱ्यावर तो दिसतोय. तुम्ही त्याच भूमातेचे वीर आहात, जिने अनेक आक्रमकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ही आपली ओळख आहे की आपण ते लोक आहोत जे बासरी वाजवणाऱ्या कृष्णाची पूजा करतात आणि आपण तेच लोक आहोत जे सुदर्शनधारी कृष्णाला आदर्श मानतात. अशाच पद्धतीने प्रत्येक आक्रमणानंतर भारत यशस्वी झाला आहे. मानवतेच्या प्रगतीसाठी शांती आणि मैत्री प्रत्येकजण स्वीकार करतो. पण शांतीने निर्बलता आणायला नको. वीरता हीच शांतीची पूर्वअट असते. आज भारत जल, स्थल, नभ आणि अंतराळापर्यंत आपली ताकद जर वाढवतोय, तर त्याचं लक्ष्य हे मानवतेचं कल्याण हेच आहे.आपण नेहमीच मानवतेच्या संरक्षणासाठी काम केलं आहे. तुम्ही सर्वजण भारताच्या या भूमिकेवर काम करत आहात’, असं मोदी यावेळी म्हणाले.

- Advertisement -

‘हे युग विकासाचं आहे. विकास हाच भविष्याचा आधार आहे. गेल्या अनेक शतकांमध्ये विकासानेच मानवतेचं सर्वाधित हित केलं. साम्राज्यवाद जेव्हा कुणावर प्रभावी झाला, तेव्हा त्याने नेहमीच विश्वशांतीसमोर धोका निर्माण केला आहे. पण मित्रांनो, इतिहास साक्षी आहे की अशी साम्राज्य नष्ट तरी झाली आहेत किंवा मार्ग बदलण्यासाठी त्यांना भाग तरी पडलं आहे. याच अनुभवाच्या आधारावर संपूर्ण जगानं पुन्हा साम्राज्यवादाचा मुकाबला करण्याचा निर्णय घेतला आहे’, असं म्हणत मोदींनी सीमेवर आगळीक करणाऱ्या चीनला थेट इशाराच दिला आहे.

‘सैनिकांसाठी आधुनिक शस्त्रास्त्र किंवा तुमच्यासाठी आवश्यक साधनसामग्री यावर आपण नेहमीच लक्ष देत आलो आहोत. देशात सीमा सुरक्षेवरचा खर्च तीन पट वाढवण्यात आला आहे. सीमेवर रस्ते बांधण्याचं काम वेगाने झालं आहे. यामुळे सीमेवर सगळं सामान कमी वेळात पोहोचतं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या पदाची निर्मिती असो किंवा नॅशनल वॉर मेमोरियलची निर्मिती, वन नेशन वन पेन्शनचा निर्णय किंवा तुमच्या सर्वांच्या कुटुंबीयांच्या देखभालीच्या दिशेने देश सातत्याने प्रत्येक स्तरावर काम करत आहे. देश आपल्या सैनिकांना मजबूत करत आहे’, असं देखील मोदींनी यावेळी सांगितलं.

- Advertisement -

‘तुमच्यासोबतच आयटीबीपीचे जवान, बीएसएफचे जवान, अभियंते, श्रमिक तुम्ही सगळेच अद्भुत काम करत आहात. प्रत्येकजण खांद्याला खांदा लावून भारतमातेच्या संरक्षणासाठी, सेवेसाठी समर्पित आहात. आज तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळेच देश अनेक संकटांचा एकाच वेळी आणि पूर्ण निश्चयाने लढू शकतोय. तुम्हा सगळ्यांच्या प्रेरणेने आपण कठीणात कठीण संकटावर विजय मिळवत आलो आहोत आणि विजय मिळवत राहणार आहोत. ज्या भारताचं स्वप्न आपण सगळ्यांनी आणि विशेषत: तुम्ही सगळे सीमेवर देशाचं संरक्षण करत आहात, आपण त्या स्वप्नांचा भारत बनवू. त्यामध्ये १२० कोटी भारतीय देखील मागे राहणार नाहीत, हे वचन द्यायला मी आलो आहो. आपण आत्मनिर्भर भारत बनवणारच. तुमच्या प्रेरणेमुळे आत्मनिर्भर भारताचा संकल्प देखील अधिक शक्तीशाली होतो’, असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -