घरदेश-विदेश'व्हीआयपी कल्चर टाळा', संसदेत नवनिर्वाचित खासदारांना मोदींचा सल्ला!

‘व्हीआयपी कल्चर टाळा’, संसदेत नवनिर्वाचित खासदारांना मोदींचा सल्ला!

Subscribe

लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या विजयी खासदारांसमोर भाषण केलं.

देशात बहुमत मिळवल्यानंतर संसद भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या सर्व यशस्वी खासदारांसमोर बाषण केलं. पंतप्रधानपदी जनतेनं पुन्हा निवडून दिल्यानंतर पहिल्यांदाच मोदींनी खासदारांसमोर जाहीर भाषण केलं. यावेळी त्यांनी एनडीएच्या यशाबद्दल सर्व खासदारांचं अभिनंदन केलं. तसेच, महिला मतदारांचं पुरुषांच्या बरोबरीने मतदान केल्याबद्दल देखील अभिनंदन केलं. यावेळी मोदींनी भारताचा विकास साध्य करण्यासाठी एनडीए कशी वाटचाल करणार आहे, याचंही धोरण उपस्थित खासदारांसमोर मांडलं. मात्र, त्यासोबतच त्यांनी उपस्थित असलेल्या विजयी खासदारांना व्हीआयपी कल्चर टाळण्याचा सल्ला दिला आहे. ‘आपणही देशाचे नागरिक आहोत. त्यामुळे व्हीआयपी कल्चर टाळायला हवं’, असं मोदी यावेळी म्हणाले. तसेच, प्रादेशिक पक्षांचं महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या सोबतीने सरकार चालवणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी मोदींची सार्वमताने एनडीएच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला.

व्हीआयपी कल्चरवरून टोचले खासदारांचे कान

यावेळी बोलताना मोदींनी एनडीएच्या सर्वच खासदारांचे चांगलेच कान टोचले आहे. ‘एखाद्या विमानतळावर तुमची कुणी तपासणी केली, तर तुम्हाला वाईट वाटतं. आपण खासदार असून आपली तपासणी कशी केली? असं तुम्हाला वाटतं. पण तुम्हीसुद्धा देशाचे नागरिक आहात हे विसरू नका. देशात लोकशाही जनता चालवत असते. याच व्हीआयपी कल्चरमुळे मोठं नुकसान झालं असून ते टाळा’, असं मोदी यावेळी म्हणाले. असं म्हणताना मोदींनी काँग्रेसला टोमणा मारल्याचं बोललं जात आहे. याशिवाय ‘आपला विजय हा जनतेमुळे आहे. आपल्याला जनादेश आहे. त्यामुळे आपल्याला जनतेच्या आदेशांचं पालन करावं लागणार आहे. त्यापासून आपण एका क्षणासाठी देखील दूर जाऊ शकत नाहीत’, असं मोदींनी यावेळी उपस्थित खासदारांना सांगितलं’, असं देखील मोदींनी खासदारांना बजावलं.

- Advertisement -

‘प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊनच जाऊ’

एकीकडे भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असताना मोदी सरकारमध्ये प्रादेशिक आणि छोट्या पक्षांचं महत्त्व कमी होईल अशी अटकळ बांधली जात असताना मोदींनी मात्र प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन जाणार असल्याचं म्हटलं आहे. ‘देशाच्या राजकारणाचे दोन ट्रॅक आहेत. एक म्हणजे रिजनल अॅस्पिरेशन्स आणि दुसरं म्हणजे नॅशनल अॅम्बिशन. याच्या आधारावरच देशाचा विकास होतो. रिजनल अॅस्पिरेशनकडे दुर्लक्ष देशासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आमचा प्रादेशिक महत्त्वाकांक्षांकडे सकारात्मक दृष्टीकोण आहे. त्यामुळे नॅशनल अॅम्बिशन आणि रिजनल अॅम्बिशन्स मिळून आमचा NARA (नारा) आहे’, असं मोदी म्हणाले. तसेच, ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा आमचा नवा नारा असेल’, असं देखील मोदींनी यावेळी भाषणात सांगितलं.

‘भाजपला ३०३ जागा मिळूनही…’

प्रादेशिक पक्षांसोबत काम करण्याची आपली बांधिलकी यावेळी मोदींनी बोलून दाखवली. ‘देशाच्या भविष्यासाठी आघाडीच्या राजकारणाचा स्वीकार करावाच लागणार आहे. एक पक्ष कितीही मोठा झाला तरी देशाच्या हितासाठी आघाडीचं राजकारण महत्त्वाचं ठरणार आहे. अटल बिहारी वाजपेयींनी देखील हेच केलं. ही गोष्ट आम्हाला ३०३ जागा मिळाल्यानंतर देखील मी सांगतोय, याचा अर्थ माझी त्याच्याशी बांधिलकी किती असेल, तुम्ही समजून घ्या’, असं ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

महिला मतदारांचं केलं अभिनंदन!

दरम्यान, यावेळी मोदींनी देशातल्या महिला मतदारांचं अभिनंदन केलं. ‘स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढं मतदान झालं आहे. यावेळी विशेष म्हणजे महिलांनी कमाल केली आहे. आत्तापर्यंत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदार कायम ५ ते ७ टक्के कमी राहिलं आहे. पण या निवडणुकीत महिला मतदारांनी बरोबरी साधली आहे. पुढच्या निवडणुकांमध्ये त्या पुढे निघून जातील. त्याशिवाय महिला खासदारांच्या संख्येचं २०१४चं आमचं रेकॉर्ड आम्ही यावेळी मोडलं आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं घडत आहे’, असं देखील मोदी म्हणाले.

‘सरकार आम्हीच बनवणार, मंत्रीपदाच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका’

‘सध्या माध्यमांमध्ये मोठी चर्चा आहे केंद्रीय मंत्रिमंडळातल्या संभावित मंत्र्यांच्या नावांची. काही लोकं थेट पीएमओच्या नावाने खोटे फोन करून दिल्लीला बोलवत आहेत. या सगळ्या माध्यमांमधल्या चर्चांमधले आकडे एकत्र केले, तर फक्त ५० खासदार शिल्लक राहतील, बाकीचे सगळे मंत्री असतील. त्यामुळे, माझी विनंती आहे की तुम्ही या सगळ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. जर कुणी म्हणत असेल की तो माझा खास आहे, त्याची वर्णी मंत्रिमंडळात लागेल, तर कृपया कुणी त्या भानगडीत पडू नये. असं काहीही होणार नाही. सरकार आम्हीच बनवणार आहोत, इतर कुणी नाही’, असं सांगत मोदींनी मंत्रीपदासाठी इच्छुक खासदारांना एक प्रकारे इशाराच दिला.

‘गरीबांचं राजकारण होत राहिलं’

‘२०१४मध्ये याच भाषणात मी म्हणालो होतो की माझं सरकार देशातल्या गरीब, वंचित, पीडितांसाठी काम करेल. आज मी पुन्हा सांगतो की ५ वर्ष आम्ही प्रत्येक क्षणी ती गोष्ट पाळली. आणि आज मी आनंदाने सांगू शकतो, की २०१९मध्ये हे सरकार देशातल्या गरीबांनी बनवलं आहे. आपल्या देशात आजपर्यंत गरीब फॅशनचा भाग बनून राहिला. राजकारणाचा विषय बनून राहिला. ५ वर्षांच्या कार्यकाराळात आपण ती पद्धत मोडून पाडण्यात यशस्वी ठरलो आहोत’ असं म्हणत मोदींनी काँग्रेसच्या सत्ताकाळावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -