आम्ही कुणाची रेषा छोटी करत नाही – नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देणारं भाषण केलं.

New Delhi
PM Narendra Modi Speech in Parliamentry Hall
पंतप्रधान नरेंद्र मोदी

संसदेच्या पहिल्या दिवशी खासदारांच्या शपथविधीदरम्यान ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याचा मुद्दा वादात सापडला होता. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना ‘आम्ही कुणाचीही रेषा छोटी करण्याच्या भानगडीत पडत नाही, तर स्वत:ची रेषा मोठी करण्यासाठी जीवनभर झटत असतो’, असं म्हणत विरोधकांना उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. लोकसभेमध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर दिलं यावेळी लोकसभा निकालांमधून मिळालेलं बहुमत आणि विरोधकांवर मोदींनी निशाणा साधला. तसेच, आणीबाणीवर देखील मोदींनी टीका केली.

‘आणीबाणीचा डाग जाणार नाही’

‘४४ वर्षांपूर्वी देशामध्ये लोकशाही मूल्यांना, माध्यमांना पायदळी तुडवण्यात आलं होतं. देशावर लागलेला हा आणीबाणीचा डाग कधीही मिटणार नाही. तेव्हा आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो होतो, आता देशाला बळकटी देण्यासाठी लढू’, असं यावेळी मोदी म्हणाले. ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी आमचे आदर्श आहेत. आम्ही कुणाचीही रेषा छोटी करत नाहीत, आमचीच रेषा मोठी करतो. पण तुम्ही इतक्या उंच गेलात की जमिनीशी तुमचं नातंच तुटलंय’, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

‘त्यांना अटलजींच्या कामगिरीचाही विसर’

यावेळी देशातल्या मतदारांचे मोदींनी आभार मानले. ‘५ वर्षांत आमच्या सरकारनं केलेल्या कामाची पावती म्हणून मतदारांनी पुन्हा सत्तेत बसवलं आहे. लोकांनी पूर्ण विचार करूनच हा जनादेश दिला आहे. त्यामुळे आता देशवासीयांचं स्वप्न पूर्ण कसं करायचं, याचा विचार मी करतो’, असं मोदी म्हणाले. याशिवाय विरोधकांच्या कौतुक न करण्याच्या वृत्तीवर देखील त्यांनी बोट ठेवलं. ‘आम्हाला विरोधकांचं कौतुक करण्याचं वावडं नाही. आम्ही कुणाचंही यश नाकारत नाही. पण पण मागच्या सरकारला नरसिंहराव सरकारच्या कामाचा देखील विसर पडला होता. अटलजींच्या कामगिरीचं देखील काँग्रेस सरकारने कधीही कौतुक केलं नाही’, असं देखी मोदी यावेळी म्हणाले.