बिहारचा विजय हा भाजपने कोरोना काळात केलेल्या कामाची पावती – पंतप्रधान नरेंद्र मोदी

pm narendra modi after bihar election
पंतप्रधान नरेंद्र मोदी

बिहार निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपकडून आज देशभरात विविध ठिकाणी जल्लोष व्यक्त करण्यात आहे. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात भाजपकडून विजयाचा सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले. बिहारची जनता ही पारखी असून त्यांनी जागरूकपणे निवडणुकीत मतदान केले. आम्ही सर्व नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये ‘सबका साथ, सबका विकास’ हे मॉडेल राबवू.

निवडणुकीत विजय-पराभव हा प्रक्रियेचा भाग आहे. मात्र निवडणूक ही भारतीय लोकशाहीचे महत्त्वाचे अंग आहे. शांतीपूर्ण वातावरणात निवडणूक पार पाडल्यामुळे निवडणूक आयोग, सुरक्षा दल आणि स्थानिक प्रशासनाचे मी आभार मानतो.

पुर्वी बिहारमध्ये मतदान झाल्यानंतर बातमी यायची की, मतदान केंद्रावर हिंसा झाली. बुथ लुटले गेले, पुन्हा मतदान घेण्यात आले. मात्र आता बातमी येते की, मतदानाचा टक्का वाढला, महिलांनी अधिक मतदान केले. अशा प्रकारच्या बातम्या येत आहे.

खरंतर कोरोनाच्या काळात एवढी मोठी निवडणूक घेणे हे धोकादायक होते. मात्र निवडणूक आयोगाने ही निवडणूक यशस्वीपणे हाताळून जगाला दाखवून दिले की आमचा लोकशाहीवर किती विश्वास आहे. या विजयाबद्दल एनडीएच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो.

भाजपने आता भारताच्या प्रत्येक राज्यात घवघवीत यश मिळवले आहेत. एकेकाळी दोन खोल्यातून दोन खासदारांसहीत सुरु झालेली पक्षाची वाटचाल आज पुर्ण देशात पक्षाचा झेंडा फडकला आहे.

जर तुम्ही जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करत असाल तर जनता देखील तुम्हाला भरभरून मतदान करते, हे कालच्या निकालातून दिसून आले आहे. यापुढे देशात विकास हेच मुद्दे असणार आहेत. ज्या लोकांना हे कळलेले नाही, त्यांचे प्रत्येक जागी डिपॉझिट जप्त झाले आहे.

मी देशाच्या जनतेला ग्वाही देऊ इच्छितो की आमचे प्रत्येक काम हे देशाला पुढे घेऊन जाणारे असेल. आमचा प्रत्येक निर्णय हा देशहितासाठी असेल. दलित, पीडित, गरीब, वंचित हे घटक केवळ भाजप पक्षात आपले प्रतिबिंब आणि प्रतिनिधित्व शोधत आहे. त्यामुळेच देशातील तरुणांचा भाजपवर विश्वास आहे. मध्यमवर्गींच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी दिवसरात्र जर कुणी काम करत असेल तर तो भाजप पक्ष आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी ज्या पक्षावर विश्वास ठेवला जातो, तो भाजप आहे. कोरोनाकाळात गरिबांना रेशन देण्यापासून ते त्यांना सुरक्षा पुरविण्यात भाजपने जे काम केले, त्याचा हा परिणाम आहे.