‘मृत्यूचा खेळ थांबवा, अन्यथा’; मोदींनी सुरु केला पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा प्रचार

pm narendra modi at un general assembly
पंतप्रधान नरेंद्र मोदी

बिहार राज्यात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपच्यावतीने आज दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात धन्यवाद सभा आयोजित केली होती. या सभेला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले. तसेच काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आता अनेक राज्यात भाजपचा झेंडा फडकला असल्याचे सांगतिले. बिहार प्रमाणे पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत भाजपला फारसे यश मिळालेले नव्हते. मोदींनी आजच्या सभेतून पश्चिम बंगाल निवडणुकीची देखील तयारी सुरु केली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी मृत्यूचा खेळ थांबवा, अशी समज देत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “काही लोक आपल्याला लोकशाही मार्गातून तोंड देऊ शकत नाहीत. म्हणून त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करण्याचा घाट घातला आहे. पण मी त्यांना आग्रहपुर्वक समजावतो आहे. मी धमकी देणार नाही, कारण ते काम जनता करणार आहे. निवडणूक येतात आणि जातात. जय-पराजय होतच राहिल. पण हा मृत्यूचा खेळ लोकशाहीत चालणार नाही. मृत्यूचा खेळ करुन कुणीही मत मिळवू शकत नाही. त्यामुळे हा खेळ वेळीच थांबवा.”

मागच्या काही काळापासून पश्चिम बंगाल आणि काश्मीरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होण्याच्या घटना घडत आहेत. १३ सप्टेंबर रोजीच गणेश रॉय नामक भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. तर ३० ऑक्टोबर रोजी काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात ३ भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती.

२०२१ च्या एप्रिल किंवा मे महिन्यात पश्चिम बंगाल राज्यात विधानसभा निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. २०१६ साली झालेल्या निवडणुकीत भाजपने २९१ जागा लढविल्या होत्या. मात्र त्यांना फक्त ३ जागी विजय मिळला होता. बिहार प्रमाणेच या राज्यातही भाजपचा मुख्यमंत्री एकदाही बसलेला नाही. त्यामुळे यावेळी भाजपने पश्चिम बंगालवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा चंग बांधलेला दिसतो.

देशसेवेसाठी तरुणांनो भाजपमध्ये या

आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी होतकरू तरुणांना भाजपमध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले. तरुणांनी पुढे येऊन भाजपच्या माध्यमातून देशसेवेमध्ये सहभागी व्हावे. आपले संकल्प पुर्ण करण्यासाठी कमळाला हाती घ्यावे, असे आवाहन मोदी यांनी केले.