दिल्ली पोलिसांना एका अज्ञात व्यक्तिने ईमेल केला असून यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांच्या अधिकृत ईमेलवर ही धमकी प्राप्त झाली आहे. एका ओळीच्या या ईमेलमध्ये सांगितले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नोव्हेंबर २०१९ मध्ये हत्या करण्यात येईल.” असे लिहिले आहे. गुप्तचर यंत्रणांनी याबाबत तपास सुरु केला आहे. पोलिसांची विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
दिल्ली पोलीस आयुक्तांना ईमेल मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेला सतर्क करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यात मोदींच्या ज्या जाहीर सभा, रॅली होणार आहेत, त्या पुढे ढकलाव्यात अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाला केली असल्याची माहिती सुत्रांनुसार समजत आहे. ज्या सर्व्हरमधून हा ईमेल पाठवण्यात आला तो ईशान्य भारतात स्थित आहे, असा प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. आसाममध्ये हे सर्व्ह असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे वाचा – लोकसभा २०१९ची तयारी! फेब्रुवारीपर्यंत नरेंद्र मोदींच्या ५० रॅली!!
याचवर्षी जून महिन्यात देखील मोदी यांच्या हत्येचा कट काही नक्षलवादी रचत असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला होता. त्यासंबंधी एक पत्र देखील त्यांना मिळाले होते. यामध्ये ‘राजीव गांधी यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांना मारू’ असा उल्लेख करण्यात आला होता. हे पत्र १८ एप्रिल २०१७ चे असून दिल्लीस्थित सामाजिक कार्यकर्ते रोना विल्सन यांच्या घरातून हस्तगत करण्यात आले होते.