मोदींना जीवे मारण्याची धमकी; मल्याळम भाषेत लिहिली नोट

केरळमधील गुरूवायूर मंदिरामध्ये पाचशे रूपयांच्या नोटेवर धमकीचा संदेश

Mumbai
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. केरळमधील गुरूवायूर मंदिरामध्ये पाचशे रूपयांच्या नोटेवर धमकीचा संदेश मिळाला असून हा संदेश मल्याळम भाषेत असल्याचे समजते. तसेच या नोटेवर इंग्रजीतही लिहिलेले आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ जून रोजी केरळचा दौरा केला होता. यावेळी केरळमधील गुरूवायूर मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली होती.

सुरक्षा यंत्रणांकडून मोदींच्या सुरक्षेचा आढावा

या गुरुवायूर प्रसिद्ध असणाऱ्या कृष्‍ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पूजा केली होती. तसेच ‘तुला भरण’ पूजन पंरपरेनुसार मोदींची येथे कमळांच्‍या फुलांपासून तुला देखील करण्यात आली होती. ही भेट देण्यापुर्वी म्हणजे ७ जून रोजी मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा संदेश मिळाला होता. दरम्यान ही धमकी देणाऱ्याचा शोध सुरू असून यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी मिळाल्यानंतर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने याला गंभीरतेने घेत याची सर्व माहिती सुरक्षा संस्थेला दिली असून सुरक्षा संस्थेनं त्यानंतर मोदी यांच्या सुरक्षेची तपासणी केली.  या प्रकाराची अधिक चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा आढावा देखील घेतला आहे.

यापुर्वीही आल्या जीवे मारण्याची धमक्या

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींना अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. २०१८ मध्ये दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांच्याकडे मोदींना मारण्याच्या धमकीचा मेल पाठवला होता, तसेच राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी एका पत्राद्वारे दिली होती. राजस्थानमधील भाजपा अध्यक्ष मदन लाल सैनी यांना एक पत्र लिहून अज्ञात व्यक्तीनं मोदींना मारण्याची धमकी देण्यात आली होती.