Video: दारुमाफियांचा हैदोस; जाब विचारणाऱ्या पोलिसालाच मारहाण!

कायदा आणि सुव्यवस्थेविषयी एकीकडे संसदेमध्ये चर्चा होत असताना रस्त्यावर मात्र परिस्थिती वेगळी दिसत आहे. उत्तराखंडमध्ये पोलिसांनाच दारु माफियांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Haridwar
Police got beaten by Mob in ambad
जमावाकडून पोलिसांना मारहाण

नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांनाच आता सुरक्षा पुरवावी लागतेय की काय? अशी परिस्थिती सध्या देशात निर्माण होई लागली आहे. पोलिसांचं गांभीर्य किंवा दरारा कमी होऊन आपण कोणत्याही पोलिसाला खिशात घेऊन फिरू शकतो, अशा आविर्भावात गुन्हेगार मंडळी उघड माथ्याने फिरू लागली आहेत. उत्तराखंडमध्ये मंगळवारी रात्री असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. दारु माफियांचा वाढता त्रास पाहाता उत्तराखंड पोलिसांनी त्यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. मात्र, काही दारू माफियांची भीड इतकी चेपली गेली आहे, की त्यांनी थेट या पोलिसांवरच हात उचलण्याचा बेताल वर्तन सुरू केलं आहे.

उत्तराखंडच्या हरिद्वारच्या राणीपूर परिसरामध्ये पोलिसांकडून काही माफियांवर मंगळवारी रात्री कारवाई करण्यात येत होती. काही तरूण एका स्कूटीमधून अवैधपणे दारू नेत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या तरुणांना हटकलं. पोलीस हवालदारानं या तरुणांना दारूसंदर्भात जाब विचारल्यानंतर नुकत्याच वीशी किंवा पंचविशीत आलेल्या या तरुणांनी समोरच्या पोलिसाला थेट मारहाण करायला सुरुवात केली. काय घडतंय हे त्या पोलिसाला कळायच्या आतच त्याच्यावर अजून काही तरुणांनी घेरून हात उचलला. विशेष म्हणजे यातलेच काही तरुण या घटनेचा व्हिडिओ काढत होते. यातलाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान, पोलिसाने हटकल्यानंतर त्यातल्याच काहींनी पोलिसावरच उलट दारू पिऊन मारहाण केल्याचा आरोप केला. त्यामुळे परिसरात काही काळ संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान, हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी ५ जणांना अटक करण्यात आली असून इतर तिघा तरुणांचा शोध सुरू असल्याची माहिती हरिद्वारच्या पोलीस अधिक्षकांनी दिली. या प्रकरणावर सोशल मीडियावर नेटिझन्सच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.