घरताज्या घडामोडीराष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस अधिकाऱ्याला अटक; दहशतवाद्यांना मदतीचा आरोप

राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस अधिकाऱ्याला अटक; दहशतवाद्यांना मदतीचा आरोप

Subscribe

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला काश्मीरमधून अटक करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया होत नसून परिस्थिती सामान्य असल्याचा दावा अनेकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या इतर अनेक नेत्यांनी केला आहे. मात्र, नुकतीच काश्मीरच्या श्रीनगर विमानतळावर तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला दोन दहशतवाद्यांसोबत अटक करण्यात आली आहे. या पोलीस अधिकाऱ्याने दहशतवाद्यांना सुरक्षित स्थळी ने-आण करण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा अधिकारी डीएसपी दर्जाचा असून त्याला २०१८मध्ये राष्ट्रपती पदकाने देखील सन्मानित करण्यात आले होते. दहशतवाद्यांच्या कारमध्येच हा अधिकारी देखील सापडला असून त्याचं नाव देविंदर सिंह असं आहे. त्याच्या घरी पोलिसांना लाखो रुपयांची रोकड सापडली आहे.

संसद हल्ल्यात देखील देविंदरचा हात?

नवीद बाबा आणि आसिफ अहमद या दोन दहशतवाद्यांना कारमधून नेत असताना देविंदर सिंगला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीमध्ये दहशतवाद्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी त्याने लाच घेतल्याचं समजल्याची माहिती आहे. त्याच्या घरातून लाखो रुपये जप्त करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. कुलगामच्या महामार्गावर या चौघांना अटक करण्यात आली. या तिघांसोबत अहमद मीर नावाची व्यक्ती देखील होती. देविंदर सिंगसोबत अहमद मीर देखील या कामात त्यांची मदत करत होता असा संशय पोलिसांना आहे. संसद हल्ल्याचा म्होरक्या अफजल गुरूने देखील कोर्टात सुनावणीदरम्यान देविंदर सिंगचं नाव घेतलं होतं.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून पोलीस देविंदर सिंगच्या मागावर होते. त्याच्या श्रीनगरमधल्या घरात देखील दहशतवादी राहिले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, देविंदर सिंगला देण्यात आलेला राष्ट्रपती पुरस्कार परत घ्यावा किंवा कसं? याविषयी लष्कर, रॉ आणि आयबीच्या तपासानंतरच निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -