पोलीस अधिकाऱ्यानं मारला ‘गब्बर’चा डायलॉग; वरिष्ठांनी थेट बजावली नोटीस!

sholey cinema dialogie pachas pachas kos dur

‘शोले’ चित्रपट न पाहिलेला किंवा त्याबद्दल न ऐकलेला व्यक्ती भारतात सापडणं कठीण आहे. या सिनेमातले अनेक संवाद आजपर्यंत लोकांना तोंडपाठ आहेत. अनेक मैफिलींमध्ये हे संवात टेचात बोलून दाखवले जातात. पण एका पोलीस अधिकाऱ्याला शोले सिनेमातला संवाद बोलणं चांगलंच महागात पडलं आहे. इतकं की त्याला थेट वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कारणे दाखवा नोटीसच बजावली आहे. आदिवासी भागांमध्ये गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा अधिकारी हा संवाद बोलायचा, अशी माहिती समोर आली आहे. पण नक्की असं झालं तरी काय की थेट नोटीस बजावण्यापर्यंत वेळ आली?

पचास पचास कोस दूर…!

हा सगळा प्रकार आहे मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातला. झाबुआच्या कल्याणपुरा पोलीस स्टेशनचे प्रभारी के. एल. डांगी आहेत. झाबुआ आणि त्यातही कल्याणपुरा पोलीस स्टेशन हा आदिवासी बहुल भाग आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणार चोरीच्या घटना वाढल्या होत्या. गावकऱ्यांमध्ये असलेल्या चोरांमध्ये दहशत निर्माण व्हावी म्हणून के. एल. डांगी हातात माईक घेऊ गावातल्या रस्त्यांवर फिरत शोले सिनेमातला हा डायलॉग म्हणायचे. ‘पचास पचास कोस दूर जब कोई बच्चा रोता है, तो मां कहती है, बेटा सो जा, वरना डांगी आ जायेगा’, असं म्हणत के. एल. डांगी कल्याणपुराच्या रस्त्यांवरून जीपमधून फिरायचे.

डांगी यांचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा होऊ लागली. हे प्रकरण झाबुआच्या एसएसपींपर्यंत गेल्यानंतर त्यांनी आता डांगी यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. अर्थात, त्यांच्यावर कारवाई काय होईल, हे अद्याप स्पष्ट नसलं, तरी शोले सिनेमातला हा डायलॉग सिनेमातला गब्बर आणि झाबुआचा ‘बब्बर’ यांच्यासाठी अडचणीचा ठरला आहे!