घरदेश-विदेशकोरोना लसीवरून तापले राजकारण!

कोरोना लसीवरून तापले राजकारण!

Subscribe

ही लस भाजपची : समाजवादी पक्षाचा आक्षेप, लसीच्या मान्यतेवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह

भारतात सीरम आणि ऑक्सफर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोवॅक्सिन या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. मात्र, आता कोरोना लसीवरून राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस ज्येष्ठ नेते जयराम रमेश व शशी थरूर यांनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मान्यता देण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

कोवॅक्सिनवर अद्याप तिसर्‍या टप्प्यातील चाचणी झालेली नाही. या वॅक्सिनला अगोदरच मान्यता दिली गेली आहे हे धोकादायक ठरू शकते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवे. सर्व चाचण्या होईपर्यंत याचा वापर करणे टाळायला हवे. दरम्यान भारत अ‍ॅस्ट्रॅजेनेका वॅक्सिनसह मोहीम सुरू करू शकतो, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. तर, जयराम रमेश यांनी देखील कोवॅक्सिनबद्दल आक्षेप नोंदवला असून, भारत बायोटेक प्रथम श्रेणीचा उद्योग आहे. परंतु आश्चर्यकारक बाब ही आहे की, कोवॅक्सिनसाठी तिसर्‍या टप्प्यातील चाचणी संबंधी आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यता मिळालेल्या प्रोटोकॉलमध्ये सुधारणा केल्या जात आहेत.आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे.

- Advertisement -

या अगोदर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी वॅक्सिनबाबत शंका उपस्थित केली होती. तसेच, मी ही लस टोचवून घेणार नाही, भाजपाच्या लसीवर आम्ही कसा काय विश्वास ठेवू? असे त्यांनी म्हटले होते. मात्र, रविवारी त्यांनी आपली भूमिका बदलल्याचे दिसून आले. लसीकरणास लवकरात लवकर सुरुवात व्हावी, असे अखिलेश म्हणाले आहेत. तसेच समाजवादी पार्टीचे आमदार आशुतोष सिन्हा यांनी देखील कोरोना वॅक्सिनबद्दल रविवारी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. या वॅक्सिनमुळे तुम्ही नपुंसक होऊ शकतात, असे खळबळजनक विधान सिन्हा यांनी केले आहे.

दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आल्याचे आज डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन सांगितल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण असल्याचे म्हणत यावर प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही एका गोष्टीची खात्री बाळगा की कशातही सुरक्षिततेची शंका असेल, जराही शंका असेल तर आम्ही त्याला कधीच मान्यता देणार नाही. लसी ११० टक्के सुरक्षित आहेत. थोडेफार दुष्परिणाम असतातच जसे की दंडावर दुखणे, थोडासा ताप येणे, थोडीशी अ‍ॅलर्जी होणे हे तर प्रत्येक लसीसाठी सामान्य आहे. असे माध्यमांशी बोलताना डीसीजीआयचे संचालक व्ही.जी.सोमाणी यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -