सुरेश वाडकर, पोपटराव पवार, राहीबाई पोपेरेंना पद्मश्री पुरस्कार

Delhi

देशी बियाणांचे जतन करून बियाणांची बँक स्थापन करणार्‍या ‘मदर ऑफ सीड’ अर्थात बीजमाता राहीबाई पोपेरे, हिवरे बाजार गावाला आदर्श गाव करणार्‍या पोपटराव पवार आणि आपल्या सुरेल आवाजाने भावगीतांसह मराठी आणि हिंदी चित्रपटातील गाण्यांना साज चढवणारे सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना शुक्रवारी केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर करून गौरविले आहे.

१९८९ पासून हिवरे बाजार हे दुष्काळग्रस्त गाव सरपंच पोपटराव यांच्या प्रयत्नांमुळे सुधारू लागले. ग्रामविकासाचा आराखडा तयार करून त्यांनी या गावाचे रुपडे बदलून टाकले. विशेष म्हणजे जलसंधारणाचे नियोजन करून गावात पहिले पाणी आणले, तसेच समपातळी चर खणून कुरण विकास झाला, याचा परिणाम होऊन गावाला रोजगार मिळाला आणि पाणीही मिळाले. दारूबंदी, सावकारी कर्ज हद्दपार करण्याचे मोठे श्रेय त्यांना जाते.

मराठीसह हिंदी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी या भाषांची उत्तम जाण असणारे सुरेश वाडकर म्हणजे एक अष्टपैलू व सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व आहे. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा गाण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटात त्यांनी ‘सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है’ हे गाणं गायले होते. या गाण्यामुळे सुरेश वाडकर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले. त्यानंतर त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत शेकडो गाणी गायली आहेत. गेल्या काही वर्षात अनेक नवे गायक आले, परंतु आजही वाडकर यांनी गायलेली ‘ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था’, ‘तू सप्तसूर माझे’, ‘सुरमयी अखियों मे’, ‘ऐ जिंदगी गले लगा ले’, ‘सपने में मिलती है’ यांसारखी अनेक गाणी रसिकांच्या ओठांवर खेळतात. आजही त्यांनी गायलेल्या भक्ती गीतांपासून अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते.