जवानांच्या मदतीने गर्भवतीची सुखरूप प्रसूती

Mumbai
राष्ट्रीय रायफल्सचे जवान

भारतीय जवान जसे शत्रूशी लढून देशाचे रक्षण करतात तसेच देशातील जनतेला पण ते वेळ प्रसंगी मदतीचा हात देताना दिसतात. जवानांनी योग्य वेळी मदत केल्याने गर्भवती महिला रुग्णालयात पोहोचली असून हिमवृष्टीमुळे रस्त्यात अडकलेल्या गर्भवतीला लष्कराच्या जवानांनी सुखरुपपणे रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिने जुळ्यांना जन्म दिला. या मदतीबद्दल महिलेने लष्कराच्या जवानांचे आभार मानले. काश्मीरच्या बांदिपोरात ही घटना घडली.

बांदिपोरातील लष्करी तळावर एका ग्रामस्थाने शुक्रवारी कॉल केला. प्रचंड हिमवृष्टी सुरू असल्याने पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी मदत करा, असे आवाहन ग्रामस्थाने लष्कराला केले. त्यानंतर जवान ग्रामस्थाच्या पत्नीच्या मदतीला धावले. त्यावेळी जोरदार हिमवृष्टीमुळे बांदिपोरातील तापमान उणे सात अंश सेल्सिअस होते. ‘बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक ठप्प होती. मात्र महिलेला काहीही करून रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते,’ अशी माहिती लष्कराच्या अधिकार्‍यांनी दिली. परिस्थिती नाजूक असल्याने आम्ही प्रशासनाशी संवाद साधला. लष्कर आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे महिला रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले. तिथे या महिलेने जुळ्यांना जन्म दिल्याचे लष्कराने म्हटले आहे.

अडीच किलोमीटरचे अंतर पायी कापले

ग्रामस्थाच्या फोन कॉलनंतर लष्कराने सूत्रे हलवली. रस्ते वाहतूक ठप्प असल्याने बांदिपोरा राष्ट्रीय रायफल्सचे जवान चालत महिलेच्या घराजवळ पोहोचले. त्यांनी महिलेला स्ट्रेचरवर ठेवले आणि अडीच किलोमीटरचे अंतर पायी कापले. यावेळी रस्त्यावर जवळपास कमरेइतका बर्फ साचला होता. यानंतर महिलेला लष्कराच्या रुग्णवाहिकेतून बांदिपोरातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.