चीनच्या फौजा युद्धाच्या पावित्र्यात

भारताकडूनही चोख तयारी

indian troops crossed border twice and attacks on chinese soldiers says china foreign minister
India and China

लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळील चीनच्या दादागिरीवर भारतीय सैन्याने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. पूर्व लडाखमध्ये चीनने लक्ष्मण रेषा ओलांडली तर चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा भारताने दिला आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकार्‍याने बुधवारी ही माहिती दिली. उंचावरील या युद्धक्षेत्रामध्ये भारतावर दबाव टाकण्यासाठी चीनकडून आक्रमक पद्धतीने सैन्य तैनाती केली जाते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही फॉरवर्ड पोझिशन्सवरील आपली स्थिती आणखी बळकट केली आहे. त्यामुळे चिनी नियंत्रण रेषेजवळील परिस्थिती खूपच संवेदनशील झाली आहे.

चुशूल सेक्टरमध्ये मुखपरी टॉपजवळ सोमवारी ४५ वर्षांत पहिल्यांदाच गोळीबार झाला. त्यानंतर भारताकडून हा इशारा देण्यात आला. आज गुरुवारी मॉस्कोमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची महत्त्वाची बैठक होती. या बैठकीवरही बरेच काही अवलंबून आहे.

पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनार्‍याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला होता. जो प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला व भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या दक्षिण किनार्‍याजवळच्या टेकड्या ताब्यात घेतल्या. तेव्हापासून चीनची दादागिरी आणि आक्रमकता वाढली आहे.

भारतानेही आतापर्यंत चीनचा घुसखोरीचा एकही डाव यशस्वी होऊ दिलेला नाही. चीनला युद्ध हवे असेल तर, त्यांना सुद्धा त्याची जबर किंमत चुकवावी लागेल असे भारतीय अधिकार्‍याने सांगितले. जशास तसे उत्तर म्हणून चीन याच क्षेत्रातील दुसरे अन्य उंचावरील भाग आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकतो. पण भारताने सुद्धा ग्राऊंड लेव्हलवर तैनात असलेल्या आपल्या कमांडर्सना परिस्थितीनुसार प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. आपले सैन्य उंचावरील क्षेत्रात शस्त्रास्त्रांसह पूर्णपणे सज्ज आहे. रेचिन ला च्या रिजलाइनजवळ आपणही रणगाडे आणून ठेवले आहेत असे या अधिकार्‍याने सांगितले.