घरदेश-विदेशराहुल गांधींचा राजीनामा काँग्रेसने फेटाळला, आता पुढे काय?

राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेसने फेटाळला, आता पुढे काय?

Subscribe

राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेस कार्यकारिणीने फेटाळला!

लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या मानहानीकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या नेतृत्वावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. या पराभवाची जबाबदारी घेऊन राहुल गांधींनी त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणीसमोर ठेवला. मात्र, ‘काँग्रेसला सक्षम विरोधकांची भूमिका निभावण्यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वाची गरज आहे’, असं सांगत काँग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधींच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमताने फेटाळला आहे. त्यामुळे राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदावर कायम राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज शनिवारी दुपारी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय एकमताने घेण्यात आला. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कार्यकारिणीचा निर्णय जाहीर केला. या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला जाण्याचा अंदाज वर्तवला गेला होता. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे लागलं होतं.


हेही वाचा – पकी मनपसंद स्वीट डिश? इज्जत का फालूदा; राहुल गांधी ट्रोल

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने यंदा भाजपच्या विरोधात देशभरात रान उठवलं होतं. मग तो राफेल विमान खरेदीत झालेला काथित घोटाळा असो किंवा मग भाजपकडून राबवला जाणारा धार्मिक अजेंडा असो. राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर आणि भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्याशिवाय काँग्रेसने देखील २०१४च्या तुलनेत यंदा रस्त्यावर उतरून, मेहनत घेऊन प्रचार केला होता. संघटना अधिक शिस्तीने कामाला लावली होती. त्याचा परिणाम म्हणून यंदा काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या काही जागा देशपातळीवर जरी वाढल्या असल्या, तरी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा वारू अडवण्यात काँग्रेसला यश मिळू शकलं नाही. एवढंच काय, भाजपच्या गेल्या निवडणुकीत २८३ असलेल्या जागा यावेळी थेट ३०३वर जाऊन पोहोचल्या. त्यामुळे या पराभवाचं सगळं खापर अर्थातच राहुल गांधींच्या डोक्यावर फुटलं.

- Advertisement -

देशभरात काँग्रेसला अवघ्या ५२ जागांवर विजय मिळाला असून काँग्रेसप्रणीत आघाडीला एकूण ८७ जागांवर समाधान मानावं लागलं. तर जिथे भाजपच्या एकूण जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली होती, तिथे भाजपला ३०३ तर भाजपप्रणीत एनडीएला ३५२ जागा मिळाल्या. त्यामुळे राहुल गांधींच्या नेतृत्वावर टीका होऊ लागली. काँग्रेसमध्ये देखील त्यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या होत्या. इतकंच नव्हे, तर त्यांच्या जागी भावी अध्यक्ष कोण होऊ शकेल, याविषयी देखील चर्चा सुरू झाली होती. त्यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे, सोलापुरात पराभूत झालेले सुशीलकुमार शिंदे, ज्योतिरादित्य सिंदिया यांची नावं आघाडीवर होती. मात्र, ‘आता अध्यक्ष गांधी परिवारातील नसावा’ असं वक्तव्य करून राहुल गांधींनी नवी चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेस कमिटीने त्यांचा राजीनामा फेटाळला जरी असला, तरी ते मात्र राजीनाम्यावर ठाम असल्याचंच यातून सूचित होत असल्याचं दिसत आहे. ‘प्रियांका गांधींच्या नावाची या पदासाठी चर्चा करू नका’, हे सांगून राहुल गांधींनी प्रियांका गांधी या स्पर्धेत नसतील, हे आधीच स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून कुणाचं नाव पुढे केलं जातं, याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -