CoronaVirus : आन्ध्रपाठोपाठ राजस्थानची मोठी घोषणा; गरीबांना मिळणार आर्थिक मदत!

Jaipur
ashok Gehlot

सोमवारी आन्ध्र प्रदेश सरकारने करोना व्हायरसमुळे राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांची रोजगार बुडाल्यामुळे उपासमार होऊ नये, म्हणून प्रत्येक कुटुंबाला १००० रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांच्या पाठोपाठ राजस्थान सरकारने देखील मोठी घोषणा केली आहे. यानुसार, सुमारे ३६ लाख दारिद्र्य रेषेखालील लोकांना, पंचवीस लाख बांधकाम कामगार आणि फेरीवाले ज्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही अशांना एक हजार रुपयांची मदत मिळणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली आहे.

राजस्थान सरकारने नुकतीच करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातली संपूर्ण खासगी वाहतूक बंद केली आहे. महाराष्ट्र सरकारप्रमाणेच फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठीच रस्त्यावर गाड्या धावू शकणार आहेत. त्याशिवाय, मध्यरात्रीपासून राज्य महामार्गावरील सर्व टोलनाके बंद करण्याचा निर्णय देखील राजस्थान सरकारने जाहीर केला आहे.

गरीबांना १ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यासोबतच राजस्थान सरकारने ७८ लाख पेन्शनरांना दोन महिन्यांची पेन्शन अॅडव्हान्समध्ये मिळण्याची देखील घोषणा केली आहे. त्याव्यतिरिक्त, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी असलेल्या रेशनकार्ड धारकांना दोन महिन्यांचं रेशन मोफत देण्याचे देखील आदेश मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here