घरदेश-विदेशज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचं निधन

ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचं निधन

Subscribe

ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचं दीर्घ आजारानं दिल्लीत राहत्या घरी निधन झालं आहे. ते ९५ वर्षांचे होते.

ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री राम जेठमलानी यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते ९५ वर्षांचे होते. दिल्लीमध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर राहत्या घरीच उपचार सुरू होते. त्यांच्या मागे मुलगा आणि प्रसिद्ध वकील महेश जेठमलानी आणि दोन मुली असा परिवार आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि विशेष न्यायालयांमध्ये जेठमलानी यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये बाजू मांडली आहे. १९५९ साली के. एम. नानावटी विरूद्ध महाराष्ट्र राज्य हा खटला त्यांच्या आयुष्यातला पहिला महत्त्वाचा खटला होता. राजदकडून त्यांनी राज्यसभेची खासदारकी भूषवली होती. शिवाय ते बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष देखील होते.

- Advertisement -

राजीव गांधी हत्या प्रकरण

मद्रास उच्च न्यायालयात २०११ साली राम जेठमलानी यांनी राजीव गांधी यांच्या हल्लेखोरांची बाजू मांडली होती. त्यावरून बराच वाद झाला होता. शिवाय शेअर बाजारात घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहता आणि केतन पारेख यांची देखील केस त्यांनी हाताळली होती. जेसिका लाल हत्या प्रकरणात त्यांनी आरोपी मनू शर्माचं वकीलपत्र घेतलं होतं. तर अफजल गुरू प्रकरणात देखील त्यांनी वकीलपत्र घेतलं होतं. २०१०मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.

- Advertisement -

राजकीय प्रवास…

याशिवाय १९७७ आणि १९८० या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये ते भाजपच्या तिकिटावर मुंबईच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात खासदार म्हणून केली होती. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यावर त्यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली होती. त्या प्रकरणात कोर्टात केस दाखल झाल्यानंतर जेठमलानी कॅनडामध्ये काही काळ राहिले. तिथून परतल्यानंतर त्यांनी पहिली लोकसभा निवडणूक जिंकली.

१९८८मध्ये ते राज्यसभेवर खासदार झाले आणि केंद्रात कायदा मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली. पुढे १९९६मध्ये वायपेयींच्या सरकारमध्ये ते नागरी विकास खात्याचे मंत्री देखील होते. अडवाणींच्या जवळचे मानले जाणारे जेठमलानी यांना पुढे वाजपेयींच्या काळातच कायदा मंत्री देखील केलं गेलं. मात्र, तत्कालीन सरन्यायाधीश आदर्श सेन आनंद यांच्याशी न पटल्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. १९९५मध्ये त्यांनी पवित्र हिंदुत्व कळघम नावाचा स्वत:चा पक्ष देखील स्थापन केला होता. मात्र तो पुढे वाढू शकला नाही.

२००४मध्ये वाजपेयींच्या विरोधात त्यांनी लखनौमधून लोकसभा निवडणूक लढवली, मात्र ते पराभूत झाले. २०१०मध्ये त्यांना पुन्हा भाजपकडूनच राज्यसभेत पाठवलं गेलं. २०१२मध्ये काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचारावर शांत बसण्याची भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी भाजप पक्षावर केला. त्यामुळे त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित देखील करण्यात आलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -